लाखनवाडा सरपंचाला मारहाण; ग्रामपंचायत सदस्यासह सहा जण अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 03:45 PM2018-06-19T15:45:09+5:302018-06-19T15:45:09+5:30
लाखनवाडा : येथील सरपंच निर्मला समाधान देशमुख यांना ग्रामपंचायतच्या विशेष सभेत मारहाण करून जखमी केल्यामुळे सरपंच निर्मला देशमुख यांनी हिवरखेड पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी ग्रामपंचायत सदस्य रमेश सावळे यांच्यासह सहा जणांविरूध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून सर्वच आरोपींना अटक करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनवाडा : येथील ग्रामपंचायतच्या विशेष सभेत मारहाण करून जखमी केल्यामुळे सरपंच निर्मला देशमुख यांनी हिवरखेड पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी ग्रामपंचायत सदस्य रमेश सावळे यांच्यासह सहा जणांविरूध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून सर्वच आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सरपंच निर्मला समाधान देशमुख यांनी दिलेल्या सरपंचपदाच्या राजीनामा पत्रावरील स्वाक्षरी सत्यतता पडताळणी करीता १८ जून रोजी ग्रामपंचायत सदस्यांची विशेष सभा बोलाविण्यात आली असता सभेच्या चर्चेदरम्यान ग्रामपंचायत सदस्य सरला रमेश सावळे व सरपंच निर्मला देशमुख यांच्या शाब्दीक वाद झाला त्याचे पर्यवसन हाणामारीत झाले होते. सरला सावळे व त्यांच्या समर्थकांना सरपंच निर्मला देशमुख यांना जबर मारहाण करून जखमी केले. त्यामुळे सरपंच देशमुख यांच्यावर सामान्य रूग्णालय खामगाव येथे उपचार सुरू आहेत. भाजपच्या दोन्ही गटात हा वाद उफाळून आला आहे. या घटनेमुळे गावात व परिसरात राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.(वार्ताहर)
मी दिलेल्या सरपंचपदाच्या राजीनामा पत्रावरील स्वाक्षरी सत्यता पडताळणीकरीता १८ जून रोजी सभा सुरू असतानाच ग्रामपंचायत सदस्य सावळे व त्यांचे समर्थक यांनी माझ्यावर हल्ला करून मला जबर मारहाण केली. सदर घटनेची कुणकुण लागल्यामुळे मी पोलीस स्टेशनला अर्ज करून पोलीस संरक्षण मागितले होते. परंतु मला मारहाण सुरू असताना पोलीस, ग्रामपंचायत सभागृहाच्या बाहेर होते. त्यांनी सुध्दा मारेकºयांना आवर घातला असता तर सदर घटना टळली असती.
- निर्मला समाधान देशमुख, सरपंच लाखनवाडा.
या घटनेमागे राजकीय षडयंत्र असून मला त्यामध्ये विनाकारण गोवल्या जात आहे. घटना ही ग्रामपंचायतीच्या आवारात घडली. आपण ग्रामपंचायतीचे सदस्य नसल्याने सभेत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ५०-६० ग्रामस्थांच्या उपस्थितीत विनयभंग करण्याचा प्रश्नच येत नाही.
-सुभाष सावळे, जिल्हा उपाध्यक्ष भाजप, किसान आघाडी, बुलडाणा.