चतुर्मास पर्वानिमित्त "अष्टपद भाव यात्रा", साध्वी हर्षरत्ना श्रीजी म. सा. यांनी विशद केले यात्रेचे महत्त्व
By ब्रह्मानंद जाधव | Published: July 16, 2023 05:36 PM2023-07-16T17:36:14+5:302023-07-16T17:36:35+5:30
अष्टपद हे पवित्र स्थान जैन धर्माच्या अनुयायांसाठी अतिशय महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे.
लोणार : शहरात चतुर्मास पर्वानिमित्त "अष्टपद भाव यात्रा" १६ जुलै रोजी पार पडली. यावेळी साध्वी डॉ हर्षरत्ना श्रीजी म. सा. यांनी यात्रेचे महत्त्व विशद केले. भगवान आदिनाथ (ऋषभदेव) यांचे पवित्र स्थान असलेल्यांपैकी एक हिमालय पर्वतरांगेतील कैलास पर्वताजवळ ४८ हजार मीटर उंचीवर अष्टपद आहे. अष्टपद हे पवित्र स्थान जैन धर्माच्या अनुयायांसाठी अतिशय महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे.
जैन धर्माचे संस्थापक आणि पहिले तीर्थंकर भगवान आदिनाथ (ऋषभदेव) यांनी या ठिकाणी तपश्चर्या करून मोक्ष प्राप्त केला होता, अशी जैन धर्मात श्रद्धा आहे. १६ जुलै राेजी स्थानिक आनंद मंगल भवन कार्यालय येथे चतुर्मास पर्वानिमित्त धर्माराधनेकरिता आलेल्या प.पू. श्री पुष्पदंताश्रीजी म. सा., प.पू. श्री. डॉ. हर्षरत्नाश्रीजी म. सा., प.पू. श्री. डॉ. दर्षरत्नाश्रीजी म. सा., प.पू. श्री काव्यदंताश्रीजी म. सा. आदी ठाणायार यांनी आज प्रवचनात अष्टपद भावतीर्थ यात्रेचे महत्त्व विशद केले.
सकाळी येथील सुनीलकुमार स्वरूपचंद बेदमुथा यांनी यात्रा करण्याचा लाभ घेतल्याने ते ‘संघपती’ होते. यांच्या नेतृत्वात निवासस्थानावरून आनंद मंगल भवनपर्यंत वाजतगाजत भाव यात्रा काढण्यात आली. त्यानंतर मंगल भवनमध्ये गुरू महाराज यांनी मंगल कार्यालयात अष्टपद तीर्थाची प्रतिकृती तयार करून प्रत्यक्ष यात्रा केल्याचा अनुभव समाजबांधवांना करून दिला. जैन धर्माच्या अनुयायांमध्ये अष्टपद यात्रेचे महत्त्व नेहमीच राहिले आहे. दरवर्षी देश-विदेशातून हजारो भाविक अष्टापद, कैलास पर्वत आणि पवित्र मानसरोवराच्या दर्शनासाठी येतात. अष्टपदात आठ पर्वतशिखरे प्रचलित आहेत; पण तरीही या नावाशी संबंधित अनेक तथ्य आहेत. कैलास मानसरोवर यात्रेला भेट देण्याच्या सर्व ठिकाणांपैकी अष्टपद हे सर्वांत सुंदर मानले जाते. कारण येथे विपुल नैसर्गिक सौंदर्य तसेच काही अतिशय अद्वितीय घटक आहेत, याबाबत यावेळी महत्त्व विशद करण्यात आले.
चिमुकल्यांच्या नाटिकेने वेधले लक्ष
यावेळी चिमुकल्यांनी सादर केलेल्या नाटिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. चिराग गोलेछा, सोमू सुराणा, ऋषभ सुराणा, ऋषभ संचेती, पार्श्व बोरा, दर्श संचेती, चेतन संचेती, हर्ष गुगलिया, पक्षाल संचेती, दिवेश खिवसरा, अंश भारीया, वांशिका लोढा, हितराज संचेती या जैन पाठशाळेच्या लहान मुलांनी आकर्षक नाटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली.