बुलढाण्यात असलम शहांचीच चर्चा; १० हजारांची सुटी नाणी देत भरला लोकसभेसाठी अर्ज
By निलेश जोशी | Published: April 3, 2024 05:48 PM2024-04-03T17:48:57+5:302024-04-03T17:49:17+5:30
हटके पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्याची त्यांची ही तऱ्हा त्यांना मतदारांनी तारले तर त्यांची अनामत रक्कम वाचवू शकते.
नीलेश जोशी, बुलढाणा: लोकसभा निवडणुकीतील राजकीय पक्षांची जुगलबंदी सर्वांनाच ठाऊक आहे. परंतु बुलढाण्यातील एका उमेदवाराने चक्क १ रुपयांची दहा हजार नाणी अर्थात दहा हजार रुपये आणि दहा व २० रुपयांच्या नोटा अनामत रक्कम म्हणून २ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. त्यामुळे असलम शहा नेटकऱ्यांसह जनमानसात चर्चेत आले आहे.
हटके पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्याची त्यांची ही तऱ्हा त्यांना मतदारांनी तारले तर त्यांची अनामत रक्कम वाचवू शकते. बुलढाणा लोकसभा निवडणुकीसाठी महालोकशाही आघाडीचे उमेदवार म्हणून असलम शहा हसन शहा यांनी २ एप्रिल रोजी त्यांचा उमेदवारी अर्ज भरला. परंतु त्यांनी त्यांच्यासोबतच्या भरभक्कम थैलीत नेमके काय आणले हे प्रसारमाध्यमांनी त्यांना विचारले असता त्यांच्या सुट्या नाण्यांची गोष्ट समोर आली. मग काय त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच दहा हजार रुपये किमतीची एक रुपयांची नाणी तेथेच रस्त्यावर सर्वांना दाखवली.
गंमत म्हणजे त्यांनी संपूर्ण रक्कमच चिल्लर स्वरूपात आणली होती. दहा हजार रुपये किमतीची एक रुपयांची नाणी त्यांच्याजवळ असतानाच दहा व २० रुपयांच्या नोटाही त्यांनी सोबत आणल्या होत्या. लोकसभा निवडणुकीसाठी भरावयाची अनामत रक्कम म्हणून उर्वरित १५ हजार रुपये त्यांनी दहा आणि २० रुपयांच्या नोटांमध्ये आणले होते. विशेष म्हणजे गावागावातील नागरिकांकडून त्यांनी ही नाणी गोळा करत आपली २५ हजारांची अनामत रक्कम भरली आहे.
त्यांच्या या अचाट कल्पनेमुळे मराठीतील ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ या चित्रपटातील नाऱ्या अर्थात नारायण वाघची व्यक्तीरेखा डोळ्यासमोर आल्याशिवाय रहात नाही.
हम पाचही है!
बर दहा हजार नाण्यांची भरभक्कम थैली व तुकोबारायांसारखी पगडी डोक्यात घालून आपल्या चार सहकाऱ्यांसह असलमशहा नेमके कोठे चालेल असा जिल्हाधिकारी कार्यालयात बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांना प्रश्न पडला होता. त्यामुळे त्यांनी त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच अडवले. तेव्हा, ‘असलम शहा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जात असून हम पाचही है!’ असे उत्तर त्यांच्यासोबत असलेल्या ॲड. सतीशचंद्र रोठे यांनी दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना आत सोडले. निवडणूक विभागाची मात्र नाणी मोजताना चांगलीच तारांबळ यावेळी उडाली होती. आता त्यांना मतदार तारतात की त्यांचे डिपॉझिट जप्त होते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल. परंतु सुट्या नाण्यांमुळे ते चर्चेत आले आहेत.