बुलढाण्यात मतदानास सुरूवात; जनस्वराज्य पक्षाच्या उमेदवारावर प्राणघातक हल्ला

By निलेश जोशी | Published: November 20, 2024 08:39 AM2024-11-20T08:39:24+5:302024-11-20T08:39:38+5:30

जनस्वराज्य पक्षाचे उमेदवार प्रशांत डिक्कर यांच्यावर पहाटे पाच वाजता प्राणघातक हल्ला झाला आहे.

Assault on Jan Swaraj Party candidate | बुलढाण्यात मतदानास सुरूवात; जनस्वराज्य पक्षाच्या उमेदवारावर प्राणघातक हल्ला

बुलढाण्यात मतदानास सुरूवात; जनस्वराज्य पक्षाच्या उमेदवारावर प्राणघातक हल्ला

बुलढाणा: १५ व्या विधानसभा निवडणुकीसाठी बुलढाणा जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात २० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता प्रारंभ झाला. प्रारंभी संथगतीने मतदान होत आहे. बहुतांश मतदारसंघावर साडेसात नंतर पहिला मतदार आल्याचे दिसून आले.
दरम्यान सकाळी ९ ते ११ आणि १ ते ३ आणि शेवटच्या टप्प्यात मतदान केंद्रांवर गर्दी होण्याची शक्यता आहे. दरम्यान जळगाव जामोद मतदारसंघातील जनस्वराज्य पक्षाचे उमेदवार प्रशांत डिक्कर यांच्यावर पहाटे पाच वाजता प्राणघातक हल्ला झाला आहे. त्यांना अकोला येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

जिल्ह्यातील सातही मतदारसंघात यंदा ११५ उमेदवार निवडणूक रिंगणात असून  २१ लाख ३४ हजार ५०० मतदार त्यांचे राजकीय भवितव्य ठरविणार आहेत. यामध्ये पुरुष ११ लाख ० हजार ७९१ तर महिला मतदार १० लाख २४ हजार ६७१ आणि तृतीयपंथी मतदार हे ३८ आहेत. जिल्ह्यात २२८८ मतदान केंद्र असून मेहकर मतदारसंघात सर्वाधिक मतदान केंद्र आहे. १८ नोव्हेंबर रोजी जाहीर प्रचार संपला होता. त्यानंतर उमेदवारांनी मुक प्रचारावर जोर दिला होता. गेल्या दोन दिवसात जिल्ह्यात अफवांनाही पेव फुटले होते. 

जिल्ह्यात गेल्यावेळी सातही मतदारसंघ मिळून सरासरी ६५.३० टक्के मतदान झाले होते. त्यामुळे यंदा किती मतादन होते याकडेही प्रशासनाचे लक्ष लागून आहे. २०१९ च्या तुलनेत जिल्ह्यात ९२ हजार ७८८ मतदार वाढले आहेत. हा मतदार कोणाला साथ देतो हे २३ नोव्हेंबर रोजी स्पष्ट होईल. परंतू जिल्ह्यात मतदानाचा टक्का अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत कमी असतो. त्यातत्या त्यात बुलढाण्यामध्ये हे प्रमाण फारच कमी आहे. गतवेळीही बुलढाणा मतदारसंघात ५८.४० टक्केच मतदान झाले होते. बुलढाणा शहरातील तब्बल ३५ हजार नागरिकांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत मतदान केले नव्हते. त्यामुळे विधानसभा निवडणूक या मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करण्यात स्वीप उपक्रमातंर्गत करण्यात आलेली जनजागृती कितपत उपयुक्त ठरते हेही बघावे लागेल. मेहकरमध्येही अशीच स्थिती होती. दुसरीकडे मलकापूर ६९ टक्के, चिखली ६५.९० टक्के, सिंदखेड राजा ६५.३० टक्के, म खामगाव ७०.४० टक्के आणि जळगाव जामोद ७०.६० टक्के मतदान झाले होते.

दुसरीकडे आठ वाजेच्या सुमारास मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी वाढण्यास प्रारंभ झाला असला तरी ७ ते ९ या कालावधीत सुमारे ७ ते ९ टक्क्यांच्या आसपास मतदान होण्याचा अंदाज प्रशासकीय सुत्रांनी व्यक्त केला आहे. त्यातच समुद्र सपाटीपासून २१९० उंचीवर असलेल्या बुलढाण्यात थंडीचा काहीसा जोरही वाढलेला आहे. पहाटे मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या काही नागरिकांनी ते आटोपताच घरी जातांना मतदानाचेही राष्ट्रीय कर्तव्य पारपाडले.

--कमी व अधिक मतदान होणाऱ्या केंद्रावर लक्ष--
बुलढाणा मतदारसंघातील २३ मतदान केंद्रांवर गेल्यावेळी ४० टक्क्यांच्या आत मतदान झाले होते. यामध्ये बुलढाणा शहरातीलच १० मतदान केंद्रांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त ८० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालेल्या ८५ मतदान केंद्रांवरही निवडणूक आयोगाचे बारकाईने लक्ष आहे. यामध्ये मलकापूरमधील १५, खामगावमधील ३१, जळगाव जामोदमधील २२, मेहकर ९, चिखली ५, सि. राजा २ आणि बुलढाण्यामधील एका केंद्राचा समावेश आहे.

सामाजिकदृष्ट्या संवेदनशील केंद्रांवरही चोख बंदोबस्त 
जिल्ह्यात सामाजिक दृष्ट्या (कम्युनल) ३८० मतदान केंद्र संवेदनशील आहेत. यामध्ये सिंदखेड राजा मतदारसंघात सर्वाधिक १०६, चिखलीमध्ये ७५, बुलढाण्यात ६१, खामगावमध्ये ५७ आणि मलकापूरमधील ४० केंद्रांचा समावेश आहे. या केंद्रावरही पोलिस प्रशासनासह निवडणूक आयोगाचे लक्ष आहे.

जन स्वराज्य पक्षाच्या उमेदवारावर हल्ला 
जळगाव जामोद मतदारसंघात जन स्वराज्य पक्षाचे उमेदवार प्रशांत डिक्कर यांच्यावर २० नोव्हेंबर रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास प्राणघात हल्ला झाला. शेगाव-मनसगाव मार्गावर कालखेड फाट्यानजीक हा हल्ला करण्यात आला आहे. त्यांना सध्या अकोला येथे उपचारासाठी हलविण्यात आले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. दोन दुचाकीवर आलेल्या चौघांनी हा हल्ला केल्याची माहिती आहे. दगडफेक करत त्यांना जबर मारहाण केल्याचेही सांगण्यात येत आहे.

Web Title: Assault on Jan Swaraj Party candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.