खासगी कोवीड रुग्णालयांच्या ऑडीटसाठी पथक नियुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 02:56 PM2020-10-23T14:56:40+5:302020-10-23T14:56:58+5:30
जिल्ह्यात कोवीड रुग्णांवर उपचार करण्यासाठी एकूण आठ रुग्णालयांना मान्यता देण्यात आली आहे.
- नीलेश जोशी
बुलडाणा: कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी चाचण्यांचा वेग वाढून रुग्णांना त्वरित अैाषधोपचार मिळावा या दृष्टीकोणातून जिल्ह्यात कोवीड रुग्णांवर उपचार करण्यासाठी एकूण आठ रुग्णालयांना मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान, कोरोनाबाधीत तथा संदिग्धांवर केलेल्या उपचारापोटी रुग्णालयाने दिलेल्या देयकांचे ऑडीटच महसूल व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचे एक पथक करणार आहे. त्यासंदर्भाने सध्या हालचालींनी वेग घेतला आहे.
यासंदर्भात बुलडाणा जिल्ह्यात खासगी रुग्णालयांनी अवाजवी देयकांची रुग्णांना आकारणी केली नसली तरी जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोरोनाबाधीतांकडून रुग्णालयांनी जादा पैसे उकळू नये म्हणून या रुग्णालयांमध्ये उपचार घेतलेल्या प्रत्येक रुग्णाच्या देयकांचे ऑडीट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी अनुषंगीक निर्देश ऑक्टोबर महिन्याचा कोवीड संसर्ग प्रतिबंध आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते.
त्यानुषंगाने आता आरोग्य विभाग व महसूल विभागाचे एक पथक गठीत करण्यात आले असून जिल्ह्यात परवानगी दिलेल्या खासगी कोवीड रुग्णालयामध्ये किती रुग्णांवर उपचार झाले, त्यांना त्यात रुग्णालयाने किती खर्च आकारला. बेड, अैाषधी, डॉक्टरांची व्हीजीट फी, सफाई यासह तत्सम बाबींसाठी किती खर्च लावण्यात आला याचे अंकेक्षणच ही दोन्ही पथके करणार आहे.
त्यासंदर्भाने एक आदर्श तक्ताही तयार करण्यात आला असून त्या तक्क्याच्या बाहेर जर अवाजवी स्वरुपात रुग्णांकडून अधिक पैसे घेतले गेले असल्यास संबंधीतांवर कारवाई केली जाईल, असे संकेतच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिले.
आठ खासगी रुग्णालयांना मान्यता
बुलडाणा जिल्ह्यात कोवीड रुग्णांवर उपचार करण्यासाठी आठ रुग्णालयांना मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये मलकापूर एक, मेहकर दोन, सिंदखेड राजा एक, देऊळगाव राजा एक, चिखली एक, खामगाव एक, शेगाव दोन, बुलडाणा येथील एका रुग्णालयाचा समावेश आहे. यासोबतच बुलडाणा शहरात आणखी दोन खासगी रुग्णालयांना कोवीड रुग्णांवर उपचार करण्यासाठी मान्यता देण्यात येणार असल्याचे संकेतही सूत्रांनी दिले.