अटल आरोग्य महाशिबिर; दिड लाखावर रुग्णांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 03:27 PM2018-12-23T15:27:05+5:302018-12-23T15:29:46+5:30
योगेश फरपट / अनिल उंबरकार शेगाव. जि बुलडाणा : अटल आरोग्य महाशिबिराअंतर्गत नोंदणी झालेल्या दिड लाखांवर रूग्णांना प्रत्यक्ष उपस्थिती ...
योगेश फरपट / अनिल उंबरकार
शेगाव. जि बुलडाणा : अटल आरोग्य महाशिबिराअंतर्गत नोंदणी झालेल्या दिड लाखांवर रूग्णांना प्रत्यक्ष उपस्थिती दर्शवीत रविवारी तपासणी करून घेतली. या महाशिबिराचे उद्घाटन पालकमंत्री मदन येरावार व गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांचे हस्ते पार पडले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून व राज्याचे वैद्यकीय शिक्षण तसेच जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य विनामूल्य अटल आरोग्य महाशिबीर रविवारी २३ डिसेंबर रोजी येथील विसावा भक्त निवास संकुलजवळील साठ एकरच्या भव्य प्रांगणामध्ये पार पडत आहे.
शिबिराच्या सुरवातीला आ. चैनसुख संचेती, आ. डाॅ. संजय कुटे व आ.आकाश फुंडकर यांनी श्री गजानन महाराज यांची आरती करून अटलजींच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी गिरीश महाजन यांचे स्विय सहायक रामेश्वर नाईक, भाजप जिल्हाध्यक्ष धृपतराव सावळे, नगराध्यक्षा सौ शकुंतलाबाई बुच, न प उपाध्यक्षा ज्योतीताई कचरे, अपर्णाताई कुटे, संतोष देशमुख, शरद अग्रवाल, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंग दुबे, मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन, अतिरिक्त पोलीस अधिक्षक शाम घुगे, न प मुख्याधिकारी अतुल पंत यांचेसह विविध विभागाचे अधिकारी, डॉक्टर्स उपस्थित होते. शिबिरात सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा दिल्या जात आहेत. सव्वा कोटी रुपयांची औषधी याठिकाणी वितरण केली जात आहे. याशिवाय रुग्ण व नातेवाईक यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था श्री गजानन महाराज संस्थांनच्यावतीने केली आहे.
रणजित पाटील यांनी केली तपासणी
शिबिरात डॉ रणजित पाटील यांनी प्रत्यक्ष सहभागी होत अस्थिरुग्णांची तपासणी केली. पालकमंत्री मदन येरावर यांनी औषधे वितरण केले.
आमदार कुटे, फुंडकर ठाण मांडून
शिबिराचे संयोजक तथा आमदार डॉ संजय कुटे सकाळपासून शिबिरस्थळी ठाण मांडून आहेत. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आमदार अॅड. आकाश फुंडकर हे सुद्धा स्वतः रुग्णांची आस्थेने चौकशी करीत आहेत.