संग्रामपुरात एटीएम चोरणारे जालन्यात पकडले; दोन कुख्यात आरोपी अटकेत, तीन फरार
By विवेक चांदुरकर | Published: January 7, 2024 05:55 PM2024-01-07T17:55:33+5:302024-01-07T17:55:56+5:30
ग्रामपूर शहरातील दाटवस्तीतून रात्री ३ वाजता दरोडेखोरांनी भारतीय स्टेट बँकेची एटीएम मशीन पळवून नेली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
संग्रामपूर : संग्रामपूर शहरातील अख्खे एटीएम लंपास करणाऱ्या टोळीच्या मुसक्या जालना पोलिसांनी आवळल्या आहेत. नाकाबंदी दरम्यान जालना जिल्ह्यातील मौजपुरी पोलिस ठाणे हद्दीत रामनगर साखर कारखाना परिसरामध्ये रविवारी सकाळी साडेआठ वाजेदरम्यान ही कारवाई करण्यात आली. गुन्ह्यात सहभागी २ आरोपींना पकडण्यात आले. ३ आरोपी फरार झाले आहेत. संग्रामपूर शहरातील दाटवस्तीतून रात्री ३ वाजता दरोडेखोरांनी भारतीय स्टेट बँकेची एटीएम मशीन पळवून नेली होती. या घटनेची माहिती प्राप्त होताच पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी केली होती.
सकाळी साडेआठ वाजता जालना जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील मौजपुरी पोलिसांना रामनगर साखर कारखाना परिसरात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने काही व्यक्ती असल्याची माहिती प्राप्त झाली. कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना आरोपींजवळ संग्रामपूर येथून पळवून नेलेली एटीएम मशीन दिसून आली. मौजपुरी पोलिसांनी आरोपींकडून एटीएम मशीनसह इतर मुद्देमाल जप्त करून दोघांना बेड्या ठोकल्या. या एटीएम मशीनमध्ये १७ लाख ७८ हजारांची रोकड असल्याची माहिती आहे. रविवारी रात्री ३ वाजेच्या सुमारास दरोडेखोर एका चारचाकी वाहनाने आले. एटीएम मशीनला त्यांनी चारचाकी वाहनाला बांधून बाहेर ओढले. ती मशीन वाहनात टाकून त्यांनी पळ काढला.
आरोपींना अशा ठोकल्या बेड्या
जालना जिल्ह्यातील मौजपुरी पोलिसांना काही व्यक्ती दरोडा टाकण्यासाठी आल्याची माहिती मिळाली. पोलिस रामनगर कारखाना समोरील एका पडक्या घराजवळ खात्री करण्यासाठी गेले. त्याठिकाणी ५ व्यक्ती एक एटीएम मशीन कापताना दिसून आले. सोबतच एक विनाक्रमांकाचे चारचाकी वाहन दिसले. पोलिसांनी तातडीने २ आरोपींना रंगेहाथ पकडले. ३ आरोपी फरार झाले. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव दयासिंग गुलजारसिंग टाक (४५), नरसिंह अतरसिंग बावरी (६०), दोघेही रा. शिकलकरी मोहल्ला, मंगळ बाजार, ता.जि. जालना येथील आहेत. तर, पळून गेलेला आकाशसिंग नरसिंग बावरी व इतर दोन अनोळखी असून आरोपींविरुद्ध मौजपुरी पोलिस ठाण्यात कलम ३९९, ३०२ सह आर्म ॲक्ट कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
सिसिटीव्ही कॅमेय्रावर मारला रंगाचा फवारा
चोरट्यांनी एटीएम चोरण्यापूर्वी सिसिटीव्ही कॅमेय्रावर रंगाचा फवारा मारला.
दरोडा टाकण्याच्या उद्देशाने काही जण आल्याची माहिती होती. घटनास्थळी धाव घेतली असता आरोपींकडे एटीएम मशीन दिसून आले. दोघांना ताब्यात घेण्यात आले. तीन आरोपी फरार आहेत.
- आर.पी. नेटके,
पोलिस उपनिरीक्षक,
मौजपुरी, पोलिस स्टेशन जालना.