राष्ट्रवादी काँग्रेसच्या बुलढाणा शहराध्यक्षांवर हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
By संदीप वानखेडे | Published: September 9, 2023 04:20 PM2023-09-09T16:20:17+5:302023-09-09T16:21:59+5:30
याप्रकरणी बुलढाणा शहर पाेलिसांत तिघांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदीप वानखडे, बुलढाणा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बुलढाणा शहराध्यक्ष अनिल दत्तात्रय बावस्कर यांच्यावर तिघांनी ८ सप्टेंबर राेजी रात्री प्राणघातक हल्ला केला. सजग असलेल्या बावस्कर यांनी हा हल्ला परतवून लावत एकास पकडले, तर अन्य दाेघे पळून गेले. याप्रकरणी बुलढाणा शहर पाेलिसांत तिघांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राकाँचे शहराध्यक्ष अनिल बावस्कर हे ८ सप्टेंबर राेजी रात्री ८ वाजता डाेसा सेंटरवर हाेते. यावेळी अचानक दाेन अज्ञात व्यक्ती ताेंड बांधून तेथे आले, त्यांनी त्यांच्याजवळील लाेखंडी राॅडने बावस्कर यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी सजग असलेल्या बावस्कर यांनी राॅड उजव्या हाताने अडवला. त्यावेळेस तेथे हजर असलेले शुभम प्रल्हाद काळे, सोनू श्रीराम अनासुने हे त्यांच्या मदतीला धावल्याने त्यांनी एका हल्लेखाेरास पकडले. तसेच दुसरा हल्लेखाेर दुचाकीवरील तिसऱ्याच्या मदतीने पसार झाला.
पकडलेल्या हल्लेखाेराला बावस्कर यांनी बुलढाणा शहर पाेलिसांत आणले. तेथे त्याला नाव विचारले असता त्याने गजानन विलास शिंदे (रा. माणिकनगर, जालना) असे सांगितले. याप्रकरणी बावस्कर यांच्या फिर्यादीवरून बुलढाणा शहर पाेलिसांनी तिन्ही आराेपींविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पाेलिस करीत आहेत.