गव्हावर अज्ञात राेगाचे आक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:16 AM2021-01-24T04:16:29+5:302021-01-24T04:16:29+5:30
दुसरबीड : यावर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे रब्बी पिकांसाठी मुबलक पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे दुसरबीड परिसरातील शेतकऱ्यांनी गव्हासह इतर ...
दुसरबीड : यावर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे रब्बी पिकांसाठी मुबलक पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे दुसरबीड परिसरातील शेतकऱ्यांनी गव्हासह इतर पिकांची माेठ्या प्रमाणात पेरणी केली आहे. गत काही दिवसांपासून गव्हावर अज्ञात राेगाने आक्रमण केल्याने गव्हाच्या ओंब्या भरत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या वतीने मार्गदर्शन करण्याची गरज आहे.
खरीप हंगामात झालेल्या नुकसानीतून सावरत शेतकऱ्यांनी रब्बी पिकांची पेरणी केली आहे. मुबलक पाणी आणि चांगले वातावरण असल्याने रब्बी पिके चांगल्या स्थितीत आहेत. एकदम चांगले आलेल्या गव्हाच्या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे चिंतेमध्ये भर पडली आहे. रोगावर नियंत्रण कसे मिळवावे, याबाबत मात्र कोणाकडूनही मार्गदर्शन करण्यात आलेले नाही.
दुसरबीड आणि परिसरामध्ये यावर्षी पाऊस जास्त पडला. विहिरींना मुबलक पाणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये हरभरा, गहू ,रब्बी, ज्वारीची पेरणी केली आहे. अचानक काही दिवसांपूर्वी आलेल्या धुक्यामुळे की काय शेतकऱ्यांच्या शेतामधील गव्हाच्या पिकावर राेग आला आहे. गव्हाचे दाणे न भरताच सुकू लागले व शेतकऱ्यांची चिंता वाढली. खडक पूर्णा नदीच्या काठावर असलेले अनंता दत्तू गवई व सुमंत दत्तू गवई दोघा भावांच्या शेतामध्ये गव्हाची पेरणी करण्यात आली. पीक जोमदार आले. परंतु गव्हाचे दाणे न भरता गव्हाच्या ओंब्या अचानक पांढऱ्या पडू लागल्या. ही लागण झाल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकाची परिस्थिती काही शेतकरी व संबंधित अधिकाऱ्यांच्या कानावर घातली. परंतु कुणीही यावर उपाययोजना किंवा प्रतिबंध लावण्याबाबत मार्गदर्शन केले नाही. गव्हावर आलेल्या राेगावर उपाययाेजना करण्याची मागणी हाेत आहे.