वरवट बकाल येथे चार वर्षाच्या बालिकेचा अपहरणाचा प्रयत्न फसला!
By Admin | Published: April 15, 2018 01:38 AM2018-04-15T01:38:05+5:302018-04-15T01:38:05+5:30
वरवट बकाल: येथील एका चार वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याची घटना १२ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजतादरम्यान घडली. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरवट बकाल: येथील एका चार वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याची घटना १२ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजतादरम्यान घडली. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
वरवट बकाल येथील शेख बिस्मिल्ला यांची ४ वर्षीय मुलगी इफरा शेख हिला १२ रोजी दुपारी ३ च्या सुमारास एका अज्ञात इसमाने चॉकलेटचे आमिष दाखवून ‘तुझे तेरे अब्बूने बुलाया’ असे म्हणत ग्रामपंचायतसमोरून उचलून नेले. दरम्यान, रस्त्याने अपहृत मुलगी ‘अब्बू कहॉ है, मुझे उनके पास जाना है’ असे म्हणताच अपहरणकर्त्याने तिला चापटा मारून संग्रामपूर रस्त्यालगत असलेल्या पांडव नदीत एका खड्डय़ात सोडले. त्यानंतर घटनास्थळावरून पसार झाला. पांडव नदी पात्रात रडण्याचा आवाज येत असल्याने दुचाकीस्वार तसेच रस्त्याने ये-जा करणार्यांनी मुलीची चौकशी केली. दरम्यान, ऑटोचालक आशिक कुरेशी याला इफरा शेख हिची ओळख पटली. त्याने तिला घरी सोडून दिले. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी १३ एप्रिल रोजी तामगाव पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
चर्चेला उधाण
यापूर्वी तालुक्यात पैशांचा पाऊस व गुप्तधन काढणार्यांच्या टोळय़ा सक्रिय होत्या. मध्यंतरी अनेकांवर करण्यात आलेल्या कारवाईमुळे या टोळ्यांना आळा बसला होता; मात्र गुरुवारच्या घटनेमुळे या टोळ्या पुन्हा सक्रिय तर झाल्या नाहीत ना, असा प्रश्न उपस्थित होत असून, खबरदारी म्हणून पालकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.