रस्त्याचे काम रद्द केल्याने नगरसेवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:33 AM2021-04-06T04:33:56+5:302021-04-06T04:33:56+5:30
अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजना व नगर परिषद निधीअंतर्गत प्रभाग क्रमांक ११ मधील खरात यांचे घरापासून ते ...
अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजना व नगर परिषद निधीअंतर्गत प्रभाग क्रमांक ११ मधील खरात यांचे घरापासून ते बापू मोरे यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्यासह दोन्ही बाजूंनी पेव्हर ब्लाॅक बसविण्याच्या कामाकरिता ५ एप्रिल २०२१ रोजी दुपारी ५ वाजेपर्यंत ई-निविदा मागविण्यात आलेल्या हेात्या. या ई-निविदेमध्ये योजनेंतर्गत मंजूर निधीशिवाय २५ टक्के अतिरिक्त खर्च हा नगर परिषद निधीतून प्रस्तावित केलेला आहे. परंतू नगर परिषदेची सध्याची आर्थिक स्थिती पाहता उपरोक्त अतिरिक्त खर्च नगर परिषद स्वत: उत्पन्नातून भागवू शकत नाही, असे कारण दाखवून या कामाची निविदाप्रक्रिया रद्द करण्याचे आदेश बुलडाणा नगराध्यक्ष नजमुन्निसा मो. सज्जाद यांनी दिले. त्यामुळे या प्रभागातील विकासकामे रद्द केली जात असल्याचा आरोप करून नगरसेवक आकाश दळवी यांनी नगरपालिका उर्दू शाळा क्रमांक तीनच्या एका खोलीत स्वत:ला कोंडून घेतले. त्यानंतर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. आत्मदहनाबाबतची माहिती मिळताच आ. संजय गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला होता. दरम्यान, आ. संजय गायकवाड यांनी नगराध्यक्ष आकाश दळवी यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर थांबविण्यात आलेले काम पूर्ण करून देण्याच्या आश्वासनानंतर आकाश दळवी यांनी आपले आंदोलन मागे घेतले.