वारसा हक्काने नोकरीसाठी दोघांचा आत्मदहनाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 02:45 PM2019-06-21T14:45:29+5:302019-06-21T14:45:40+5:30
बुलडाणा : वारसा हक्काने सेवेत सामावून घेण्यासाठी दोन जणांनी गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.
बुलडाणा : वारसा हक्काने सेवेत सामावून घेण्यासाठी दोन जणांनी गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करुन दोघांनाही ताब्यात घेतले. सतीश कांबळे आणि राहीबाई साबळे अशी आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांची नावे आहे.
यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, सिंदखेडराजा नगरपालिकेमध्ये मालनबाई छगन कांबळे व ममताबाई नामदेव साबळे या दोघी सफाई कामगार म्हणून कार्यरत होत्या. सन १९९७ मध्ये दोघीही सेवानिवृत्त झाल्या. वारसा हक्कानुसार त्यांच्या जागी सेवेत सामावून घेण्यासंदर्भात अनुक्रमे सतीश तुळशीराम कांबळे व राहिबाई रंगनाथ साबळे यांनी पालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केला. मात्र प्रशासनाने जाणिवपूर्वक टाळाटाळ करुन फसवणूक केल्याचा आरोप वारसदारांनी केला. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. परंतू अपेक्षित कार्यवाही झाली नाही. सतीश कांबळे यांनी याच मागणीसाठी मध्यंतरी उपोषणही केले होते. परंतू त्यावेळी आश्वासन देऊन त्यांना उपोषण मागे घेण्यास सांगण्यात आले. मात्र आश्वासनाची पूर्तता करण्यात आली नव्हती. वारसा हक्काने सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी जवळपास त्यांनी २१ वर्ष पाठपुरावा केला होता. मात्र त्याचा काहीच फायदा होत नसल्याने सतीश कांबळे व राहीबाई साबळे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. शहर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करुन त्यांचा प्रयत्न हाणून पाडला.