वैनगंंगा - नळगंगा नदी जोड प्रकल्पाला गती देण्याचा प्रयत्न- जयंत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 05:43 PM2021-02-08T17:43:30+5:302021-02-08T17:46:49+5:30
Jayant Patil News मुळ प्रस्ताव आहे, तो मंजूर होणे आवश्यक आहे, असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी बुलडाणा येथे स्पष्ट केले.
बुलडाणा: वैनगंगा-नळगंगा या नदीजोड प्रकल्पाला गती देण्याचा आमचा प्रयत्न आहे. तो एकदा कागदावर मंजूर झाला की त्याचे पाणी विदर्भात कशा पद्धतीने खेळवायचे हे आपल्या हातात आहे. प्रामुख्याने या प्रकल्पातंर्गत ६० टीएमसी पाणी आणणे आणि विदर्भातील जिल्ह्यात टप्प्या टप्प्याने वाटप होणे हा जो मुळ प्रस्ताव आहे, तो मंजूर होणे आवश्यक आहे, असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी बुलडाणा येथे स्पष्ट केले. वैनगंगा-नळगंगा या नदी जोड प्रकल्पासोबतच पैनगंगा नदीही त्यास जोडल्यास बुलडाणा जिल्ह्यातील घाटावरील तालुक्यांसह वाशिम, यवतमाळसह अन्य जिल्ह्यांनाही त्याचा लाभ होईल. त्यादृष्टीने प्रयत्न करण्याची मागणी होत आहे. माँ जिजाऊ जलसमृद्धी नदीजोड प्रकल्प समितीही त्यासाठी आग्रही आहे. त्यासंदर्भाने जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी ही बाब स्पष्ट केली.
मुख्यत्वे ६० टीएमसी पाणी आणण्याचे आपले प्रयत्न आहेत. त्याचा पाठपुरावा सुरू आहे. त्यात निश्चितच आपण एका चांगल्या निष्कर्षाप्रत येवू असे जलसंपदामंत्री जयंत पाटील पुढे म्हणाले.
दरम्यान अमरावती विभागातील सिंचन अनुशेष दुर करण्यासाठी मधल्या काळात फारसे यश आले नाही. त्यात अडचणी आल्यात. तो दुर करण्यासाठी सध्या जिल्हानिहाय आपण बैठका घेत आहोत. सध्याच्या आढावा बैठकांचा हाच मुळ उद्देश असल्याचे ते म्हणाले. जेणेकरून या विभागातील प्रकल्पांच्या कामांना गती यावी. सोबतच अडचणी दुर होवून उपलब्ध निधी खर्च व्हावा यासाठी आपण प्रयत्नरत असल्याचे ते म्हणाले. सोबतच जिगाव प्रकल्पाच्या कामालाही गती देणार असून जिगाव प्रकल्प पुर्णत्वाच्या दृष्टीने केंद्राकडून उपलब्ध होणार जवळपास २०० कोटी रुपयांचा निधी मधल्या दोन वर्षात उपलब्ध झाला नाही. तो येत्या काळात मिळेल अशी आशा आहे. यासोबतच पुनर्वसन व भुसंपादनाचे काही जटील प्रश्न मार्गी लावून येत्या काळात किमान सात टीएमसी पाणी जिगाव प्रकल्पात साठविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे ना. पाटील म्हणाले.