पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात शेतकऱ्याचा विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 04:57 PM2019-01-14T16:57:12+5:302019-01-14T16:57:27+5:30
बुलडाणा : शेतकऱ्याने विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी दुपारी पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात घडली. विजय इश्वरसिंग चव्हाण ...
बुलडाणा : शेतकऱ्याने विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी दुपारी पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात घडली. विजय इश्वरसिंग चव्हाण असे या शेतकऱ्याचे नाव असून तो बुलडाणा तालुक्यातील तारापूर येथील रहिवासी आहे. शेतकरी विजय चव्हाण याने तीन ते चार महिन्यापूर्वी मोताळा तालुक्यातील लोणघाट येथील आपला मामा शेरसिंग साबळे यास बैलजोडी विकली होती. मात्र मामा पैसे देण्यास टाळाटाळ करुन फसवित असल्याचा आरोप करीत विजय चव्हाण याने बुलडाणा ग्रामिण पोलिस पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी शेरसिंग साबळेविरुध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल केला होता. न्यायालयाने याप्रकरणी शेरसिंग साबळे यास जामीन मंजुर केलेला आहे. दरम्यान सोमवारी शेतकरी विजय चव्हाण बुलडाणा येथे आला. मला न्याय मिळाला नाही असे म्हणत त्याने पोलिस अधीक्षक कार्यालयात विष घेवून आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतू पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करुन त्याचा प्रयत्न हाणून पाडला. तसेच त्यास ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी करण्यात आली. याप्रकरणी शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
४४ हजारात झाला होता व्यवहार
शेतकरी विजय चव्हाण याने आपल्या मामास ४४ हजार रुपयांमध्ये बैलजोडी विकली होती. त्यावेळी १०० रुपये सौदा देवून हा व्यवहार पक्का करण्यात आला होता. तर १० हजार रुपये देवून उर्वरित पैसे सहा महिन्यानंतर देण्याचे ठरले होते. मात्र मामा पैसे देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करीत शेतकरी विजय चव्हाण याने आत्महत्येचा प्रयत्न केला.
याप्रकरणी ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल आहे. तर न्यायालयाने आरोपीस जामीन मंजूर केलेला आहे. व्यवहारातील पैसे देण्यास उशिर होत असल्यामुळे हा प्रकार घडला.
- अमित वानखडे ठाणेदार, ग्रामिण पोलिस स्टेशन बुलडाणा