सैलानी यात्रेत तीन वर्षीय मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न; आरोपीस न्यायालयीन कोठडी
By निलेश जोशी | Published: March 26, 2024 06:14 PM2024-03-26T18:14:40+5:302024-03-26T18:14:52+5:30
बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी यात्रेत २४ मार्चच्या मध्यरात्री जांभळीवाले बाबा दर्ग्यानजीक एका भाविकाच्या राहूटीमधून तीन वर्षीय मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला.
पिंपळगाव सराई: बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी यात्रेत २४ मार्चच्या मध्यरात्री जांभळीवाले बाबा दर्ग्यानजीक एका भाविकाच्या राहूटीमधून तीन वर्षीय मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी आरोपी विरोधात रापयूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान सैलानी यात्रेतून यापूर्वीही एक तीन वर्षाचा मुलगा बेपत्ता झाला आहे.
या प्रकरणी लोणार येथील विलास शेषराव शिंदे यांनी पोलिसांत तक्रार दिली. होळीच्या दिवशी रात्री एक वाजेच्या दरम्यान जांभळीवाले बाबा दर्गा परिसरामध्ये त्यांनी राहूटी उभारली होती. त्यामध्ये नातेवाईकासोबत ते रहात होते. दरम्यान त्यांचा नातू हा आईसोबत राहूटीमध्ये झोपलेला होता. त्यावेळी आरोपी शेख सुलतान शेख हबीब (रा. पीरनगर, जिल्हा नांदेड) याने रात्रीच्या वेळी राहूटीमध्ये घुसून तीन वर्षीय मुलाला उचलून नेले. हा प्रकार विलास शिंदे यांनी बघितला. शिंदे यांनी त्वरित हालचाल करत आरोपी शेख सुलतान शेख हबीब यास पकडून रायपूर पोलिसांच्या स्वाधीन केले. प्रकरणी रायपूर पोलिसांनी शेख सुलतान शेख हबीब याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
घटनेचे गांभिर्य पहाता अप्पर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी तसेच एसडीपीअेा सुधीप पाटील यांनी २५ मार्च रोजी रायपूर पोलिस स्टेशनला भेट ेदऊन आरोपी शेख सुलतान शेख शेख हबीब याची कसून चौकशी केली. त्यानंतर त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. याप्रकरणी रायपूर ठाणेदार दुर्गेश राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय ओम प्रकाश सावळे तपास करीत आहे. या प्रकरणातील आरोपी हा तृतियपंथीयाच्या वेशषात होता.
दोन दिवसापूर्वीही एक मुलगा बेपत्ता
सैलानी यात्रेत गेल्या चार दिवसापूर्वीही एक तीन वर्षाचा मुलगा बेपत्ता झाला आहे. परभणी येथील तो असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे सैलानी यात्रेत रात्रीच्या वेळी लहान मुलांवर पालकांनी लक्ष ठेवणे गरजेचे आहे. प्रसंगी एखादी मुळे पळवून नेणारी टोळीही सक्रीय झाली असावी अशी शक्यता व्यक्त होत आहे.