प्रेमविवाह केलेल्या मुलीस बळजबरीने परत नेण्याचा प्रयत्न!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 12:06 AM2017-07-18T00:06:16+5:302017-07-18T00:06:16+5:30
नागरिकांनी माता-पित्यांना केले पोलिसांच्या स्वाधीन!
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : प्रेमविवाह करून आलेल्या व पतीच्या घरी राहत असलेल्या मुंबई येथील युवतीस तिच्या पित्याने घरच्यांच्या पश्चात बळजबरीने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. सदर बाब लक्षात येताच नागरिकांनी कार अडवून त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले. हा प्रकार सोमवारी सकाळी घडला.
येथील गजानन कॉलनीमधील रहिवाशी पंकज जगन्नाथ गवई वय २७ हा मागील वर्षी मुंबई येथे वाहनचालक म्हणून काम करीत होता. त्यावेळी त्याचे तेथील तन्वी रमेश संख्ये वय २३ हिच्याशी प्रेमसंबंध जुळले. दरम्यान, दोघांनी २२ एप्रिल २०१७ रोजी अकोट येथे आर्य समाज पद्धतीने विवाह केला व गेल्या काही दिवसांपासून ते दोघे स्थानिक गजानन कॉलनी भागात राहत आहेत. दरम्यान, पंकज हा सोमवारी सकाळी कामावर गेल्यानंतर तन्वीचे आई, वडील व काही नातेवाईक कार क्र. एमएच ०४- जीआर ९१९१ ने त्यांच्या घरी आले व त्यांनी तन्वीला बळजबरीने गाडीत बसविले. ही बाब परिसरातील काही नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी कारचा पाठलाग करून जलंब नाक्यावर गाडी अडविली व गाडीसह सर्वांना पोलिसांच्या स्वाधीन केले. यावेळी तन्वी व पंकज यांनी आम्ही सहमतीने लग्न केल्याचे पोलिसांना सांगून लग्नाचे प्रमाणपत्र सादर केले. पोलिसांनी दोघांचेही बयान नोंदविले असून, वृत्त लिहेपर्यंत कारवाई सुरु होती.