मंडळ अधिकाऱ्याला ठार मारण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 08:53 AM2020-01-17T08:53:50+5:302020-01-17T08:54:00+5:30
गौण खनिज वाहतूक करणाऱ्या टिप्पर चालकाने मंडळ अधिकार्यास ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी रात्री 12.30 वाजता घडली.
जलंब: गौण खनिज वाहतूक करणाऱ्या टिप्पर चालकाने मंडळ अधिकार्यास ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी रात्री 12.30 वाजता घडली. या प्रकरणी मंडळ अधिकारी यांनी पोलिसात तक्रार दिली असून, टिप्पर चालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील रेतीघाटांचा लिलाव झाला नसतानाही नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात रात्रीच्या वेळी गौण खनिजाची चोरी होत आहे. त्यामुळे शेगाव तहसीलदारांनी रात्रीच्या वेळी पथके नेमून गौण खनिजाचे रक्षण करण्याची जबाबदारी मंडळ अधिकारी व तलाठ्यावर सोपवली आहे.
गुरुवारी रात्री माटरगावचे मंडलाधिकारी संजय बापुराव देशमुख हे ड्युटीवर असताना त्यांना एक टिप्पर गौण खनिज घेऊन जाताना आढळून आले, त्यामुळे त्यांनी पाठलाग करत त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र संबंधित टिप्पर चालकाने तहसीलच्या गाडीचा अपघात घडवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र तहसीलच्या वाहन चालक संतोष सातभाकरे यांनी समयसूचकता साधत गाडी बाजूला घेतली, यामुळे अपघात होण्यापासून टळला. याप्रकरणी संजय देशमुख यांनी जलंब पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे.
महिनाभरातील चौथी घटना
गौण खनिज रोखण्यासाठी ड्युटीवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर वाहन घेऊन त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची ही घटना महिनाभरातील चौथी घटना आहे, यापूर्वीसुद्धा पोलीस स्टेशनला व जिल्हा प्रशासनाकडे कर्मचाऱ्यांनी तक्रारी दाखल केलेल्या आहेत.