संतनगरीत भाविकांची मांदियाळी
By Admin | Published: April 4, 2017 12:31 AM2017-04-04T00:31:56+5:302017-04-04T00:31:56+5:30
रामजन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
गजानन कलोरे - शेगाव
संत श्री गजानन महाराज संस्थानच्यावतीने श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात येत असून, विविध धार्मिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यानिमित्त शेगावात भाविकांचा महापूर आला असून, संतनगरी गजबजली आहे.
यात सोमवार, ३ एप्रिल रोजी सकाळी १० वा. यागाची पूर्णाहुती व अवभृतस्नान, दुपारी १२ वा. श्रीराम जन्म सोहळा व दु.२ वा. श्रींच्या पालखीची रथ, मेणा व गज अश्वासह नगर परिक्रमा निघाली. या उत्सव काळात एक हजारच्या जवळपास भजनी दिंड्यांचे संतनगरीत आगमन झाले. श्रीरामनवमी उत्सवानिमित्त सकाळी १० ते १२ श्रीराम जन्मोत्सवाचे कीर्तन हभप विष्णुबुवा कव्हळेकर यांचे पार पडले. तद्नंतर १२ वा. श्रीराम मंदिरासमोर आकर्षक सजावट केलेल्या चांदीच्या पाळण्यात श्रीराम जन्मोत्सवाचा सोहळा पारंपरिक पद्धतीने साजरा झाला. याप्रसंगी भक्तगणांची मांदियाळी पाहायला मिळाली. मंगळवारी दु.२ वा. श्रींच्या पालखीची रथ, मेणा व गज अश्वासह टाळकरी व पताकाधारी यांच्यासह शिस्तीत नित्यनेमाने पालखी मिरवणुकीसाठी प्रस्थान करणार आहे. याप्रसंगी श्रींच्या रजतमुखवट्याचे पूजन कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या हस्ते करून पालखी मार्गस्थ होणार आहे. ५ एप्रिल रोजी जगन्नाथबुवा म्हस्के सकाळी काल्याचे कीर्तन, नंतर दहीहंडीने उत्सवाची सांगता होईल.