ग्रामीण भागात 'कोरोना' खबरदारीवर लक्ष- संतोष शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2020 05:03 PM2020-05-02T17:03:51+5:302020-05-02T17:04:02+5:30
खबरदारी घेण्यात येत असल्याची माहिती बुलडाण्याचे तहसीलदार संतोष शिंदे यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.
- सोहम घाडगे
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहे. कोरोनाबाबत जिल्ह्यातील सध्याची परिस्थिती नियंत्रणात आहे. त्यामुळे घाबरुन जाण्याचे कारण नाही. मात्र खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे. सध्या ग्रामीण भागात स्थलांतरीतांचे प्रमाण खुप मोठे आहे. त्यामुळे गावात येणाºया प्रत्येकाची नोंद घेऊन खबरदारी घेतली जात आहे. खेड्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्यात येत असल्याची माहिती बुलडाण्याचे तहसीलदार संतोष शिंदे यांनी 'लोकमत'शी बोलतांना दिली.
कोरोना प्रतिबंधासाठी महसूल प्रशासनाचे काय प्रयत्न सुरु आहे?
महसूल प्रशासनातील प्रत्येक अधिकारी, कर्मचारी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी काम करीत आहे. जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी सकाळी ८ ते १२ ची वेळ दिली आहे. नियमांचे उल्लंघन करण्यांवर महसूल पथकाकडून दंडात्मक कारवाई करणे सुरु आहे. सोशल डिस्टंसिंग पाळा, मास्क वापरा, साबणाने नियमित हात धुवा, घराबाहेर पडू नका याबाबत महसूल प्रशासनाची सातत्याने जनजागृती सुरु आहे.
मोफत तांदुळ वाटप झाले का?
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने तीन महिन्यांसाठी मोफत तांदुळ देण्याचे जाहीर केले आहे. अंत्योदय व अन्नसुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना याचा लाभ देण्यात आला आहे. प्रत्येकी पाच किलो याप्रमाणे तांदूळ वाटप करण्यात आले. एप्रिल, मे व जून महिन्यासाठी मोफत तांदळाचे वाटप करण्यात आले आहे. याशिवाय सामाजिक संस्था, सेवाभावी संस्थाही धान्य कीट वाटप करीत आहेत.
पारध येथे पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्यानंतर काय उपाययोजना केल्या?
पारध हे गाव जालना जिल्ह्यात असले तरी बुलडाणा जिल्ह्याला लागून आहे. त्यामुळे तेथे पॉझिटीव्ह रुग्ण आढळताच मराठवाड्याला जोडणारे सर्व रस्ते सील करण्यात आले आहे. अगदी पांदण रस्ते सुद्धा बंद केले आहेत. नाक्यावर तपासणी कडक करण्यात आली आहे. सैलानी येथील बेघर व त्यांच्या नातेवाईकांचा जेवणाचा प्रश्न मार्गी लागला आहे. स्वत: भेट देऊन तेथील परिस्थिती बघितली. खरच त्या लोकांची समस्या गंभीर आहे.पोटाला पोटभर जेवण त्यांना मिळाले पाहिजे. यासाठी सैलानी ट्रस्टला जेवण पुरविण्याच्या सूचना दिल्या. तेथील इतरही अडचणी सोडविण्यात येतील.
गरजूंच्या जेवणाची सोय कशी केली?
लॉकडाउन काळात संत गजानन महाराज संस्थान शेगावकडून गरजू नागरिकांच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करण्यात येत आहे. सामान्य रुग्णालयातील रुग्ण, नातेवाईक, क्वॉरंटीन केलेले, निर्वासित, बेघर, कर्तव्यावरील पोलिस, आरोग्य कर्मचाºयांना हे डबे पुरविले जातात. दररोज दोन वेळेसाठी जवळपास २ हजार डबे शहरात येतात. वाटपासाठी महसूल कर्मचारी, संस्थांची मदत होते. संकटाच्या काळात शेगाव संस्थानकडून मोठे सेवा कार्य केले जात आहे. त्यांच्यामुळे गरजू, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांना दोन वेळच्या जेवणाची सोय झाली आहे. शेगाव संस्थानच्या सेवाकार्याला खरच तोड नाही.