कडक निर्बंधांकडे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:34 AM2021-05-26T04:34:34+5:302021-05-26T04:34:34+5:30
गावाचे निर्जंतुकीकरण; पाणी शुद्धतेकडे दुर्लक्ष बुलडाणा : ग्रामीण भागात सध्या वारंवार निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात येत आहे, तर दुसरीकडे पिण्याच्या ...
गावाचे निर्जंतुकीकरण; पाणी शुद्धतेकडे दुर्लक्ष
बुलडाणा : ग्रामीण भागात सध्या वारंवार निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात येत आहे, तर दुसरीकडे पिण्याच्या पाण्याच्या शुद्धतेकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. काही विहिरींत ब्लिचिंग पावडर टाकली जात नाही. पाणी शुद्धतेकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.
विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त
बुलडाणा : शहर परिसरातही आता दिवसभरात कित्येकदा वीज गुल होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. वातावरणातील उकाड्यामुळे कुलर, पंख्याची गरज भासते. मात्र वीजपुरवठा खंडित होत असल्याने जीवाची तगमग होते.
अनधिकृत कपाशी बियाण्यांवर नजर
बुलडाणा : बियाण्यांमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे सध्या अनधिकृत कपाशी बियाण्यांवर कृषी विभागाचे पथक नजर ठेवून आहे. कुठे अनधिकृत बियाणे विक्रीतून शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी प्रशासन अलर्ट झाले आहे.
विनाकारण फिरणाऱ्यांवरील कारवाई थंडावली
बुलडाणा : शहर परिसरात विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाईची मोहीम आता थंडावली आहे. त्यामुळे बाहेर पडणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. सकाळ ११ वाजेपर्यंत तर दुकानांसह रस्त्यावरही चांगलीच गर्दी दिसून येते.
रस्त्यावरील कचरा धोकादायक
मेहकर : शहरातील अनेक प्रभागांमध्ये तसेच रुग्णालयांच्या परिसरात रस्त्यावरच कचरा फेकला जात आहे. या कचऱ्यामध्ये मास्क, हॅण्डग्लोव्हज् व इतर काही रुग्णांनी वापरलेल्या वस्तू असतात. त्यामुळे रस्त्यावरील हा कचरा धोकादायक ठरत आहे.
मंडप व्यावसायिकांना लॉकडाऊनचा फटका
हिवरआश्रम : लॉकडाऊनचा फटका मंडप व्यावसायिकांना बसला आहे. ऐन सिझनमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने त्यांचा व्यवसाय ठप्प पडला आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. व्यावसायिकांना शासनाकडून मदत देण्याची गरज निर्माण झाली आहे.
घरपोच पाणी कॅन बंद
लोणार : लॉकडाऊनमुळे घरपोच आरओ वॉटर कॅन वाटप बंद आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यांना पाण्यासाठी वॉटर एटीएमवर जावे लागत आहे. मात्र त्या ठिकाणी काॅइन उपलब्ध नसल्याने गैरसोय सहन करावी लागत आहे.
कांद्याचे भाव घसरल्याने शेतकरी चिंतेत
बुलडाणा : शेतकऱ्यांचा कांदा निघण्यापूर्वी कांद्याला ४० ते ५० रुपये प्रतिकिलो भाव होता. मात्र आता १५ ते २० रुपयांनी कांद्याची विक्री होत आहे. भाव घसरल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. आता खरीप हंगामातील पेरणीचा खर्च भागवायचा कसा, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
स्थलांतरित लाभार्थ्यांच्या पोषण आहाराचा प्रश्न
बुलडाणा : लॉकडाऊनमुळे मजुरीसाठी स्थलांतरित झालेली अनेक कुटुंबे पुन्हा स्वगृही परत आली आहेत. अशा सर्व स्थलांतरित कुटुंबांमधील ३ महिने ते ६ महिने वयोगटातील बालके, ३ ते ६ वर्षे वयोगटातील बालके, गरोदर आणि स्तनदा माता, पोषण आहार न मिळणारी कॉन्व्हेंटमधील बालके अशा स्थलांतरित लाभार्थ्यांच्या पोषण आहाराचा प्रश्न अद्यापही कायम आहे.
परवानाधारक केंद्रावरूनच खरेदी करा
सिंदखेड राजा : नियोजन व पुरवठ्याच्या आकडेवारीनुसार सध्या मुबलक खत उपलब्ध आहे. तालुकास्तरावर विक्री सुरू झाली आहे. शेतकऱ्यांनी परवानाधारक केंद्रावरूनच खरेदी करावी, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.