खामगाव बस स्थानकावर भाजीपाल्याची हर्रासी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 04:42 PM2020-05-08T16:42:59+5:302020-05-08T16:43:14+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान, बसस्थानक आणि नगर पालिका शाळेच्या आवारात भाजीपाला हर्राशीला सुरूवात करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगर पालिका प्रशासनाच्यावतीने खामगाव शहरातील भाजीपाला अडत गत महिनाभरापासून बंद ठेवण्यात आली होती.
दरम्यान, शेतकऱ्यांना तसेच भाजीपाला विक्रेत्यांना भाजी विक्रीसाठी तत्वत: मान्यता देत, शहरात पाच ठिकाणी भाजीपाला अडत सुरू करण्यात आली आहे. भाजीपाला अडत सुरू झाल्याने गत दीड महिन्यांपासून बंद असलेल्या बसस्थानकावर गुरूवारी गर्दी दिसून आली.
खामगाव येथील भाजीपाला हर्राशीत फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे निदर्शनास येताच नगर पालिका मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांनी सुरूवातीला खामगाव येथील भाजीपाला हर्राशीत रात्रीच्या वेळी भेटी दिल्या. तीन भेटीत गंभीर परिस्थिती आढळून आल्याने, भाजी विक्री करणाºया व्यापाऱ्यांना सुरूवातीला नोटीस देण्यात आली. मात्र, परिस्थितीत काहीही सुधारणा न झाल्यामुळे मुख्याधिकाºयांनी खामगाव येथील भाजीपाला हर्राशी बंद केली. गत महिनाभरापूर्वी हा निर्णय घेण्यात आला. तत्पूर्वी शहरात भाजी विक्रीसाठी ८० आणि फळ विक्रीसाठी २५ दुकानांना परवानगी देण्यात आली. मात्र, भाजीपाला हर्राशी बंद झाल्याने आसपासच्या परिसरातील शेतकरी आणि भाजी विक्रेत्यांचे हाल होत असल्याचे निदर्शनास येताच मुख्य भाजीपाला अडत वगळता इतर ठिकाणी ५ तात्पुरत्या स्वरूपातील अडत सुरू करण्याचा निर्णय घेतला. फिजीकल डिस्टन्सिंग आणि इतर बांबीची पूर्तता केल्यानंतर तत्वत: खामगाव शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान, बसस्थानक आणि नगर पालिका शाळेच्या आवारात भाजीपाला हर्राशीला सुरूवात करण्यात आली.
गुरूवारी या हरार्शीचा पहिलाच दिवस होता. मात्र, तरीही या ठिकाणी शेतकरी आणि भाजीपाला अडत्यांचा चांगला प्रतिसाद दिसून आला. परिसरातील शेतकºयांना सुविधा व्हावी, यासाठी भाजीपाला अडत सुरू करण्यात आली. मात्र, या ठिकाणी फिजीकल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशाराही मुख्याधिकाºयांनी संबंधितांना दिला आहे.अडत सुरू करण्यापूर्वी भाजीपाला अडते आणि शेतकºयांना पालिका प्रशासनाच्यावतीने सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर बुधवारी रात्री हर्राशी सुरू करण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या. गुरूवारी सकाळी प्रत्यक्ष हर्राशीला सुरूवात करण्यात आली.
पालिका मैदानावरही झाली हर्राशी!
बसस्थानक, आंबेडकर मैदान, आणि नगर पालिका शाळेत भाजीपाला हर्राशी सुरू करण्यापूर्वी या ठिकाणी फिजीकल डिस्टन्सिंगसाठी रकाने आखण्यात आले. प्रत्येक अडतीत १०० मीटरचे अंतर ठेवण्यात आले. त्यानंतरच आंबेडकर मैदान आणि नगर पालिका शाळेत भाजीपाला हर्राशीला सुरूवात करण्यात आली.