मेहकर तालुक्यात शेततळ्यांमुळे १२ कोटी लीटर पाण्याची उपलब्धता!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 11:54 PM2018-02-04T23:54:27+5:302018-02-04T23:56:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
हिवरा आश्रम : ‘मागेल त्याला शेततळे’, ही योजना मेहकर तालुक्यात शेतकर्यांसाठी संरक्षित शेती सिंचनासाठी उपयुक्त ठरत आहे. मेहकर तालुक्यात तब्बल १४0 शेततळे पूर्ण झाले असून, जवळपास १२ कोटी २६ लाख लीटर पाणी उपलब्ध झालेले आहेत. त्यामुळे शेतकर्यांचा कल या योजनेकडे वाढला आहे.
राज्यात गेल्या काही वर्षांत पावसाचे प्रमाण कमी तसेच अनिश्चित झाले आहे. त्यामुळे कोरडवाहू क्षेत्रातील पूर्णत: पावसावर अवलंबून असलेल्या पिकावर, तसेच त्यांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धनच्या माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे तसेच संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी शेतकर्यांसाठी ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे.
यापूर्वी झालेला शेततळय़ांच्या कामामुळे शेतकर्यांना खरीप हंगामात पावसाच्या खंडित कालावधीत फायदा झाला असून, उत्पादनात काही प्रमाणात शाश्वतता आली आहे. आतापर्यंत मेहकर तालुक्यातील १४0 शेततळय़ांचे काम पूर्ण झालेले आहे. या शेततळय़ांच्या माध्यमातून पावसाचे अतिरिक्त वाहून जाणारे पाणी जमिनीतच जिरविण्यात आल्याने परिसरातील विहीर व बोअरवेलच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. पावसाळय़ाच्या दिवसांत हेच शेततळे किमान तीन वेळा पावसाच्या पाण्याने भरल्या जात असल्याने कमी-अधिक छत्तीस कोटी लीटर पाण्याची उपलब्धी होत आहे. यापैकी काही भागात पाणी जिरते, तर उर्वरित पाणी पावसाच्या खंडित कालावधीत शेती सिंचनासाठी वापरण्यात येत आहे. त्यामुळे शेतकर्यांचा फायदा झाला आहे.
विहिराला रब्बी हंगामात पाणी कमी असते. या शेततळ्याचा फायदा झाला असून, रब्बी हंगामात तूर आणि हरभरा पिकाला संरक्षित सिंचनाचा फायदा यामुळे मिळाला.
-अविनाश अर्जुन दुतोंडे, शेतकरी, उसरण.
शेततळे निर्माण केल्यामुळे शेतकर्यांचे उत्पादन व उत्पन्नात वाढ होऊन शेतकर्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होत आहे. शेततळे ही योजना शेतकर्यांसाठी संजीवनी देणारी योजना ठरली आहे.
- गणेश गिरी, उपविभागीय कृषी अधिकारी, मेहकर.