जळगाव तालुक्यात सरासरी ६६२ मिमी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 11:50 PM2017-10-22T23:50:25+5:302017-10-22T23:50:53+5:30

जळगाव जामोद : तालुक्यात सरासरी पाऊस ६८३ मि.मी. अपेक्षित आहे. एवढा पाऊस झाला म्हणजे तालुक्यात पुरेसा पाऊस झाला अशी महसूल विभागाच्या लेखी नोंद घेतली जाते. मात्र यंदा परतीच्या पावसानंतर जळगाव तालुक्याची सरासरी पावसाची नोंद ६६२ मि.मी. झाली असून अपेक्षित सरासरीपेक्षा फक्त २१ मिमी.ने कमी आहे.

Average 662 mm rainfall in Jalgaon taluka | जळगाव तालुक्यात सरासरी ६६२ मिमी पाऊस

जळगाव तालुक्यात सरासरी ६६२ मिमी पाऊस

googlenewsNext
ठळक मुद्देधरणे, विहिरींची पातळी खालावलेलीचशेतकरी चिंतातुर

नानासाहेब कांडलकर । 
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव जामोद : तालुक्यात सरासरी पाऊस ६८३ मि.मी. अपेक्षित आहे. एवढा पाऊस झाला म्हणजे तालुक्यात पुरेसा पाऊस झाला अशी महसूल विभागाच्या लेखी नोंद घेतली जाते. मात्र यंदा परतीच्या पावसानंतर जळगाव तालुक्याची सरासरी पावसाची नोंद ६६२ मि.मी. झाली असून अपेक्षित सरासरीपेक्षा फक्त २१ मिमी.ने कमी आहे. असे असूनही तालुक्यातील गोडाडा, राजुरा व धानोरा ही तीन धरणे व विहिरींची पातळी प्रचंड खालावलेली असल्याने पिण्याच्या पाण्यासह रब्बी हंगाम कसा करावा, अशी चिंता शेतकरी वर्गाला लागली आहे.
जळगाव तालुक्यात पाच ठिकाणी पर्जन्यमापक यंत्रे बसविली आहे. या यंत्रांच्या नोंदीनुसार यावर्षी जून ते ऑक्टेाबर या पाच महिन्यात जळगावात ७९३ मि.मी. पावसाची नोंद झाली म्हणजे अपेक्षित सरासरी पावसापेक्षा ११0 मि.मी.ने जळगावात जास्त पाऊस आहे. असे असले तरी जळगाव शहराला लागून असलेल्या गोडाडा धरणात ५0 टक्क्यापेक्षाही कमी पाणी आहे. याच धरणावरुन जळगावकरांची तहान भागविली जाते. अपेक्षित सरासरीपेक्षा जळगाव नगरात जास्त पाऊस होवूनही धरण तहानलेले का? याचा शोध घेतला असे लक्षात आले की, सातपुडा पर्वतराजीत पाऊस न झाल्याने धरणात जलसाठा अत्यल्प आहे. तसेच विहिरींची पाण्याची पातळीही खालावलेलीच आहे. अशी विसंगत स्थिती का निर्माण झाली असावी याचे संशोधन भुजल सर्वेक्षण विभागाने करणे गरजेचे आहे.
जामोद सर्कलमध्ये ६२७ मि.मी., वडशिंगी सर्कलमध्ये ६५३ मि.मी., आसलगाव सर्कल ६२५ मि.मी. तर पिंपळगाव काळे सर्कलमध्ये ६१३ मि.मी. पाऊस झाला. अर्थात या चारही सर्कलमधील पाऊस महसूल विभागाने निश्‍चीत केलेल्या सरासरी ६८३ मि.मी. पावसापेक्षा ३0 ते ७0 मि.मी.ने कमी आहे. शासनाच्या दरबारी मात्र फक्त जळगाव मापन केंद्रातील पाऊसच गृहीत धरला जातो. या पृष्ठभूमीवर जळगाव तालुक्यात सरासरीपेक्षाही जास्त पर्जन्यमान आहे असा शेरा मारला जातो. वास्तव स्थिती मात्र यापेक्षा वेगळी आहे. विहिरींची पाण्याची पातळी वाढली नाही. धरणात फक्त ५0 टक्केच जलसाठा आहे. त्यामुळे हे वास्तव समोर आले पाहिजे.
सन २0१३ मध्ये तालुक्यात सर्वाधिक सरासरी पाऊस ९३४ मि.मी. झाला होता. तर सन २0१४ मध्ये फक्त ६२७ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. सन २0१५ हे वर्ष साधारण बरे राहिले. यावर्षी ७0६ मि.मी.पाऊस झाल्याने धरण व विहिरींची स्थिती चांगली होती. सन २0१६ मध्ये म्हणजे मागील वर्षी पावसाने पुन्हा कमी राहिली. ६३२ मि.मी. वरच पाऊस थांबला. यावर्षी सरासरी नोंद ६६२ मि.मी. झाली असली तरी जळगाव वगळता जामोद, वडशिंगी, आसलगाव व पिंपळगाव काळे येथे कमी पाऊस आहे. भविष्यात पाणी टंचाई जाणवेल सोबतच शेतकर्‍यांचा रब्बी हंगाम सुध्दा होणार नाही.

पूर्णा नदीला पूर नाही    
दरवर्षी पूर्णा नदीला एक तरी पूर जातो. या नदीला पूर गेल्यानंतर विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ होते असा शेतकर्‍यांचा अनुभव आहे. यावर्षी मात्र पूर्णा नदीला एकही पूर गेला नाही. तसेच नदी काठोकाठ भरुन काही दिवस वाहत होती असेही चित्र निर्माण झाले नाही. त्यामुळे विहिरींची पातळी अत्यंत कमी आहे. अमरावती व अकोला जिल्ह्यात जरी पाऊस झाला तरी पूर्णा नदीला पूर येतो. याचा अर्थ या दोन जिल्ह्यातही पुरेसा पाऊस झाला नसावा असा शेतकर्‍यांचा अंदाज आहे.

Web Title: Average 662 mm rainfall in Jalgaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस