बुलडाणा जिल्ह्यात पावसाची सरासरी ५९ टक्क्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 03:11 PM2019-08-05T15:11:06+5:302019-08-05T15:11:10+5:30
बुलडाणा: पावसाळ््याच्या दोन महिने उलटल्यांतर बुलडाणा जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ५९ टक्के पाऊस झाला असून संग्रामपूर आणि बुलडाणा तालुक्यात पावसाने आतापर्यंत दमदार हजेरी लावलेली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: पावसाळ््याच्या दोन महिने उलटल्यांतर बुलडाणा जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ५९ टक्के पाऊस झाला असून संग्रामपूर आणि बुलडाणा तालुक्यात पावसाने आतापर्यंत दमदार हजेरी लावलेली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील १३ पैकी दहा तालुक्यात पावसाने ५० टक्क्यांच्यावर सरासरी ओलांडली असली तरी मराठवाड्यालगतच्या देऊळगाव राजा, लोणार आणि मेहकर तालुक्यात मात्र अपेक्षीत पाऊस पडलेला नाही. त्यामुळे येथील स्थिती काहीशी चिंताजनक आहे.
चार आॅगस्ट रोजी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात २.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यात प्रामुख्याने संग्रामपूर तालुक्यात ८.४ मिमी तर नांदुरा तालुक्यात ५.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दुसरीकडे बुलडाणा जिल्ह्यात वार्षिक सरासरी ६६७.८ मिमी पाऊस पडतो. त्या तुलनेत आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात सरासरी ३९३.५ मिमी पावसाची नोंद झाली असून त्याची टक्केवारी ही ५८.९३ टक्के आहे. यामध्ये प्रामुख्याने संग्रामपूर तालुक्यात ८१.२१ टक्के, बुलडाणा तालुक्यात ७६.६८ टक्के, शेगाव तालुक्यात ७२.९५ टक्के पाऊस पडला आहे. जळगाव जामोद तालुक्यात ६९.२८ टक्के पाऊस पडला आहे. एकंदरीत गतवर्षीच्या दुष्काळाच्या सावटातून बाहेर पडण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात तुलनेने चांगला पाऊस पडला असला तरी पलढग हा मध्यम प्रकल्प वगळता अन्य प्रकल्पांमध्ये मात्र अपेक्षीत असा जलसाठा झालेला दिसत नाही. त्यामुळे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी जिल्ह्यात अद्यापही चांगल्या दमदार पावसाची गरज निर्माण झाली आहे. राज्यात अन्यत्र मात्र पावसाने कहर केलेले असताना त्या तुलनेत गेल्या दोन दिवसात बुलडाण्यामध्ये पाऊस मात्र साधारण पडला आहे.
देऊळगाव राजात कमी पाऊस
जिल्ह्यातील बुलडाणा, चिखली, सिंदखेड राजा, खामगाव, शेगाव, मलकापूर, नांदुरा, मोताळा, संग्रामपूर, जळगाव जामोद या तीन तालुक्यात पावसाने वार्षिक सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक हजेरी लावली असली तरी देऊळगाव राजा, लोणार आणि मेहकर या तीन तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. एकट्या मराठवाड्याच्या लगत असलेल्या देऊळगाव राजा तालुक्यात तर पावसाळ््यातील दोन महिन्यानंतरही पावसाची सरासरी ही ३४.९१ टक्केच आहे.