जुलैमध्येही जिल्ह्यात सरासरीच पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:23 AM2021-07-04T04:23:56+5:302021-07-04T04:23:56+5:30

बुलडाणा : जिल्ह्यात जून महिन्यात वार्षिक सरासरीच्या ६ टक्के पावसाची तूट असतानाच जुलै महिन्यातही सरासरी १७० मिमी ते २०० ...

Average rainfall in the district even in July | जुलैमध्येही जिल्ह्यात सरासरीच पाऊस

जुलैमध्येही जिल्ह्यात सरासरीच पाऊस

googlenewsNext

बुलडाणा : जिल्ह्यात जून महिन्यात वार्षिक सरासरीच्या ६ टक्के पावसाची तूट असतानाच जुलै महिन्यातही सरासरी १७० मिमी ते २०० मिमीदरम्यानच पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात मर्यादित स्वरूपातच पाऊस पडणार असल्याचे संकेत आहेत.

हवामानाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या देशातील १९६ जिल्ह्यांमध्ये बुलडाण्याचा समावेश आहे. त्यामुळे जवळपास ३० टक्के क्षेत्रावरील रखडलेल्या पेरण्या, पिकांचे जीवनचक्र, प्रकल्पातील जलसाठा पाहता कमी दिवसात येणाऱ्या वाणांना शेतकऱ्यांनी पसंती देण्याची गरज असल्याचे मत जिल्हा कृषी हवामान केंद्राचे आहे.

दरम्यान, नवी दिल्ली येथील भारतीय हवामान विभागाने जुलैपासून दर महिन्याचा पावसाचा अंदाज देण्यास प्रारंभ केला आहे. त्यानुषंगाने १ जुलै रोजी प्राप्त झालेल्या अंदाजानुसार बुलडाणा जिल्ह्यात जुलै महिन्यात सरासरी १८० ते २०० मिमी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. अर्थात जिल्ह्यात जुलै महिन्यात सरासरी १८९ मिमीच्या आसपास पाऊस पडतो. त्यामुळे जुलै महिन्यात जिल्ह्यात भरपूर पाऊस पडेल, असा जनसामान्यांचा अंदाज असला तरी प्रत्यक्षात सरासरीएवढाच पाऊस पडण्याची शक्यता नवी दिल्ली येथील भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली असल्याचे जिल्हा कृषी हवामान केंद्रातील हवामानतज्ज्ञ मनेष यदुलवार यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कमी दिवसांत येणाऱ्या वाणाला शक्यतो पेरणीसाठी पसंती द्यावी, असेही त्यांनी साप्ताहिक कृषी सल्ल्यामध्ये सांगितले आहे.

--२ लाख ४० हजार हेक्टवर पेरणी बाकी--

जिल्ह्यात अद्यापही ७ लाख ३४ हजार १७७.२२ हेक्टरपैकी २ लाख ४० हजार हेक्टरवर पेरणी बाकी आहे. त्यामुळे कृषी हवामान केंद्राच्या सल्ल्यानुसारच शेतकऱ्यांनी पेरणी करावी. सोबतच सध्या पावसाने दिलेली ओढ पाहता शेतातील आर्द्रतेचे व्यवस्थापन करण्यासाठी कोळपणीलाही काही शेतकरी प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे.

-- आठ तालुक्यांत कमी पाऊस--

शेगाव, मलकापूर, नांदुरा, मोताळा, संग्रामपूर, जळगाव जामोद, बुलडाणा या तालुक्यांत अन्य तालुक्यांच्या तुलनेत कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे या भागात दमदार पावसाची गरज आहे. या भागातील बहुतांश पेरण्या रखडलेल्या आहेत. त्यामुळे नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजाकडेही शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

--प्रकल्पातील जलसाठा--

मोठे प्रकल्प सरासरी जलसाठा

१) नळगंगा २८.७९

२) पेनटाकाळी २९.३३

३) खडकपूर्णा मृतसाठा

--मध्यम प्रकल्प--

१) पलढग १४.११

२) ज्ञानगंगा ६९.६७

३) मस ४२.२९

४) कोराडी १००

५) मन ४४.६६

६) तोरणा २१.६४

७) उतावळी २९.७६

यासोबतच ८१ लघु प्रकल्पांमध्ये २०.९० टक्के जलसाठा आहे. जिल्ह्यातील ९१ प्रकल्पांमध्ये सध्या २७ टक्के जलसाठा उपलब्ध आहे.

--जूनमध्ये पडलेला सरासरी पाऊस--

तालुका पाऊस

बुलडाणा १५.३८

चिखली ३१.७५

दे. राजा २१.२०

सि. राजा ३१.२९

लोणार १७.३२

मेहकर ३१.३९

खामगाव २१.७५

शेगाव ४.७२

मलकापूर ०९.८८

नांदुरा १०.०२

मोताळा १५.९२

संग्रामपूर १५.०५

जळगाव जा. ०६.१७

एकूण सरासरी १८.१९

(वार्षिक सरासरीच्या तुलनेत पडलेला पाऊस टक्केवारीमध्ये.)

Web Title: Average rainfall in the district even in July

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.