खामगाव येथील कोविड केअर सेंटर बंद करण्यास टाळाटाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 11:54 AM2021-01-24T11:54:20+5:302021-01-24T11:54:36+5:30
Covid Care Center News कार्यरत आरोग्य कर्मचारी आपल्या पूर्वीच्या कर्तव्यावर हलविण्यात आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : तालुक्यातील कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत झपाट्याने घट होत आहे. त्यामुळे पिंपळगाव राजा रोडवरील कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांची वाणवा असून, रुग्णालयात कार्यरत आरोग्य कर्मचारी आपल्या पूर्वीच्या कर्तव्यावर हलविण्यात आले आहेत. दरम्यान, कोविड केअर सेंटर बंद करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात असल्याची वस्तुस्थिती समोर येत आहे.
कोरोना संक्रमण कालावधीत खामगाव येथील शासकीय मुलींच्या आणि मुलांच्या वसतिगृहात तब्बल २०० रुग्णक्षमता असलेले कोविड केअर सेंटर कार्यान्वित करण्यात आले होते. यामध्ये मुलींच्या वसतिगृहात १५० तर मुलांच्या वसतिगृहात ५० रुग्णक्षमता असलेले बेड सुसज्ज होते. बुलडाणा येथील जिल्हा प्रशासनाकडून येथे सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. तेथूनच आवश्यक त्या साहित्याची खरेदी करण्यात आली होती. रुग्णांचे जेवण आणि इतर सुविधा तहसील प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या. दरम्यान, कोविड केअर सेंटरवरील साहित्याबाबत संदिग्धता असल्याचे दिसून येते. याबाबत विचारणा केली असता संबंधित अधिकाऱ्यांनी काहीही सांगण्यास स्पष्टपणे नकार दिला.
दोघांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण
विदेशात आणि भारतातही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत होती. दरम्यान, ब्रिटन येथून आल्यानंतर खामगावात पॉझिटिव्ह आढळून आलेल्या दोघांचा क्वारंटाईन कालावधी संपला आहे. त्यामुळे कोविड स्ट्रेन-२ बाबत कोणतीही भीती आता राहिलेली नाही.
सेंटरमधील साहित्याबाबत संदिग्धता
खामगाव तालुक्यासह परिसरात कोरोना रुग्णांच्या संख्येचा स्फोट झाल्यानंतर खामगाव येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णसंख्या वाढीस लागल्यानंतर पिंपळगाव राजा- घाटपुरी रोडवरील मुलींच्या वस्तीगृहाच्या बाजूलाच असलेल्या मुलांच्या वस्तीगृहात कोविड केअर प्रतीक्षालय सुरू करण्यात आले.
दोन्ही कोविड केअर सेंटरसाठी बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाकडून साहित्य खरेदी करण्यात आले. तसेच येथे आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. तर तहसील प्रशासनाकडून जेवण आणि इतर सुविधा देण्यात आल्या होत्या.