वृद्ध कलावंतांचे मानधन अर्ज मंजुरीच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:23 AM2021-07-04T04:23:58+5:302021-07-04T04:23:58+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील कलावंतांच्या अनेक मागण्या शासनदरबारी प्रलंबित आहेत. या संदर्भात अखिल भारतीय मराठी शाहीर परिषदेची बैठक घेण्यात आली. बैठक ...
बुलडाणा जिल्ह्यातील कलावंतांच्या अनेक मागण्या शासनदरबारी प्रलंबित आहेत. या संदर्भात अखिल भारतीय मराठी शाहीर परिषदेची बैठक घेण्यात आली. बैठक संपल्यानंतर जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे २०१९-२०२० ची वयोवृद्ध कलावंतांची निवड करण्यात यावी, कलावंतांना स्वातंत्र्यसैनिकांचा दर्जा देण्यात यावा, कलावंतास ६००० रुपये, ५००० रुपये व ४००० रुपये या श्रेण्यांमध्ये मानधन अदा करण्यात यावे, बंद पडलेला जिल्हास्तरीय सांस्कृतिक कलामहोत्सव पुन्हा सुरू करण्यात येऊन तो प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी घेण्यात यावा. निवड झालेल्या संस्थांना शासकीय कार्यक्रम देण्यात यावेत. सध्या असलेल्या मानधन समितीकडून चालू वर्षाची चाचणी घेऊन २०० वयोवृद्ध कलावंतांची यादी प्रसिद्ध करण्यात यावी, वृद्ध कलावंतांना दरमहा मानधन अदा करण्यात यावे, कोराेना परिस्थितीत कलावंताना १० हजार रुपयांची मदत देण्यात यावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी अखिल भारतीय मराठी शाहीर परिषदेचे जिल्हाध्यक्ष शाहीर हरिदास खाडेभराड, शाहीर प्रमोद दांडगे, दीपक महाराज सावळे, भावराव निंबाळकर यांच्यासह जिल्हा व तालुक्यातील पदाधिकारी हजर होते.