१५ ऑगस्टच्या ग्रामसभा शासनाच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2021 11:06 AM2021-08-11T11:06:47+5:302021-08-11T11:06:55+5:30
Khamgaon News : यावर्षी ग्रामसभा घ्यायच्या की नाही, याबाबत गावकरी शासन निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत.
- विवेक चांदूरकर
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : १५ ऑगस्ट रोजी गावात ग्रामसभा घेऊन त्यामध्ये पुढील वर्षीचे गावाच्या विकासाचे तसेच आर्थिक नियोजन करण्यात येते; मात्र कोरोनामुळे ग्रामसभा घेण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे यावर्षी ग्रामसभा घ्यायच्या की नाही, याबाबत गावकरी शासन निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत.
१५ ऑगस्ट रोजी गावांमध्ये ग्रामसभा घेण्यात येते. या ग्रामसभेत गतवर्षी आढावा घेण्यात येतो, तसेच पुढील वर्षीचे आर्थिक नियोजनही करण्यात येते. पुढील गावात करावयाची विकास कामे तसेच त्याकरिता लागणारा निधी याचे नियोजन करण्यात येते, तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ कुणाला द्यायचा, रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गावात कोणती विकासकामे करायचा, याचे नियोजन या ग्रामसभेत करण्यात येते. त्यामुळे ही ग्रामसभा गावाच्या विकासासाठी महत्त्वाची असते. त्यामुळे यावर्षी ग्रामसभा घेण्याची परवानगी मिळते की नाही, या निर्णयाच्या प्रतीक्षेत गावकरी आहेत. ग्रामपंचायतींचा कारभार पारदर्शक व्हावा, या हेतूने महाराष्ट्र शासनाने ग्रामसभा संदर्भामध्ये ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मध्ये काही सुधारणा करून १६ ऑक्टोबर २००२ रोजी ग्रामपंचायत सुधारणा अध्यादेश काढला. त्यामुळे ग्रामसभांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. मागील वर्षापासून कोविड-१९ च्या प्रभावाने असामान्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या एकही नियमित ग्रामसभा घेतल्या गेल्या नाही.
आता बुलडाणा जिल्ह्यात दररोज दहाच्या आत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहे. अनेक गावे कोरोनामुक्त झाली आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या नियमित ग्रामसभा घेण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे. ग्रामपंचायतीच्या मासिक सभा होतात. सरपंच, सदस्य विविध ठराव पारित करीत असतात, तसेच वैयक्तिक लाभाची निवड करणे आदीबाबत अनियमितता होत आहे. त्यामुळे ग्रामसभा घेण्याची मागणी जोर धरत आहे.
गावांमध्ये ग्रामसभा घेण्याबाबत अद्याप शासनाच्यावतीने कोणतेही आदेश आले नाहीत. १५ ऑगस्ट रोजी घेण्यात येणाऱ्या ग्रामसभा आता अन्य दिवशी घेण्याचे शासनाचे आदेश आहेत; मात्र ग्रामसभा घ्यायची की नाही, याबाबत आदेश आलेले नाहीत.
- चंदनसिंग राजपूत
गटविकास अधिकारी, खामगाव.