ज्ञानगंगा अभयारण्यालगतच्या गावांमध्ये ‘कोरोना’ बाबत जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 05:21 PM2020-04-08T17:21:59+5:302020-04-08T17:22:23+5:30
ज्ञानगंगा अभयारण्यालगतच्या गावांमध्ये कोरोना विषाणूबाबत जनजागृती मोहीम सुरू केली आहे.
बुलढाणा : ज्ञानगंगा अभयारण्यातील वन व वन्यजीवांचे संरक्षण करणाºया अकोला वन्यजीव विभागाच्या वन कर्मचाºयांनी बुधवारी ज्ञानगंगा अभयारण्यालगतच्या गावांमध्ये कोरोना विषाणूबाबत जनजागृती मोहीम सुरू केली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील ४ तालुक्यात २०५ चौरस किलोमीटर क्षेत्रावर ज्ञानगंगा अभयारण्य विस्तारलेला आहे. या अभयारण्यात बिबट, अस्वल, तडस यासारखे हिंस्र प्राणी आहेतच. तर आता पट्टेदार वाघानेही या अभयारण्याला आपले अधिवास बनवले आहे. त्यामुळे येथील कर्मचाºयांवर अधिक जवाबदारी वाढलेली आहे. सध्या उन्हाळ्याच्या काळात सर्व वन कर्मचाºयांवर वन्यजीवांच्या पाण्याची व्यवस्था करणे, सर्व पाणवठ्यांची देखरेख करणे, जंगलाला वणवा लागू नये यासाठी फायर लाईन मारणे, वणवा प्रतिबंध करण्याचे विविध कामे सोबतच या काळात वन्यजीवांच्या शिकारी होण्याची जास्त शक्यता असते, तेव्हा त्याला प्रतिबंध करण्यासाठी दिवस रात्र गस्तीचे काम सुरु आहे. या कामांसोबतच सध्या ‘कोरोना’चे संकट पाहता जंगलालगतच्या गावांमधून ‘कोरोना’बाबत वन्यजीव विभागामार्फत जनजागृती करण्यात येत आहे. एका वाहनावर लाऊडस्पीकर लावून त्याद्वारे गावातील प्रत्येक गल्लीतून फिरून जनजागृती करण्यात येत आहे. लोकांना आपल्या घरातच राहण्याचे आवाहन केले जात आहे. अकोला वन्यजीव विभागाचे विभागीय वन अधिकारी मनोजकुमार खैरनार यांच्या मार्गदशर्नाखाली बुलडाणा वन परिक्षेत्र अधिकारी मयूर सुरवसे, वनपाल गीते, वनरक्षक चव्हाण, गवई व सर्व वन मजूर यांनी बुधवारी देव्हारी व गोंधनखेड गावांमध्ये जाऊन जनजागृती केली. लोकांना जंगलात न जाण्याचा सल्ला ही दिला. यावेळी वन कर्मचारी व मजूरांना मास्कचे वाटप करण्यात आले.