५६ गावांमध्ये माती परीक्षणाविषयी जनजागृती - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:33 AM2021-03-20T04:33:24+5:302021-03-20T04:33:24+5:30
प्रत्येक क्षेत्राचे माती परीक्षण करून घेणे व त्या आधारे जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण जाणून घेऊन त्यानुसार पुढील हंगामात घेतल्या जाणाऱ्या ...
प्रत्येक क्षेत्राचे माती परीक्षण करून घेणे व त्या आधारे जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण जाणून घेऊन त्यानुसार पुढील हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकासाठी खतमात्राची शिफारस करणे, पिकांच्या पेरणीच्या वेळी बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या खत प्रकारानुसार खताचे प्रमाण निश्चित करून वापर करणे, यामुळे खताचा समतोल वापरास चालना मिळेल, या उद्देशाने मृदा आरोग्यपत्रिका योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना दोन वर्षांनी एकदा त्यांच्या शेतजमिनीची मृदा आरोग्यपत्रिका उपलब्ध करून देणे हा प्रमुख उद्देश ठेवून सन २०१५-१६ पासून मृदा आरोग्यपत्रिका हा कार्यक्रम तालुक्यामध्ये राबविण्यात येत आहे. बागायती क्षेत्रासाठी २.५० हेक्टर क्षेत्रामधून एक मृद नमुना व कोरडवाहू क्षेत्रासाठी १० हेक्टर क्षेत्रामधून एक मृद नमुना याप्रमाणे पीक निघाल्यानंतर व पेरणीपूर्वीच्या मधल्या काळात जेव्हा जमीन मोकळी असते, या कालावधीत मृद नमुने काढून मृद आरोग्यपत्रिका तयार करण्यात आलेल्या आहेत. या मृद आरोग्यपत्रिकेचे वितरण शेतकऱ्यांना यापूर्वीच करण्यात आलेले आहे. यावरूनच गावाचा जमीन सुपीकता निर्देशांक तयार करण्यात येऊन या जमीन सुपीकता निर्देशांकाचे फ्लेक्स तयार करून प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीमध्ये लावण्यात येत आहे. त्यामध्ये शेतकरी घेत असलेली महत्त्वाची पिके व फळपिके यांना लागणाऱ्या खतमात्रा तसेच सूक्ष्म अन्नद्रव्य याबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे. यासाठी लागणाऱ्या मात्रा प्रतिएकर व प्रतिहेक्टर यांची विभागणी करून देण्यात आलेली आहे. मेहकर मंडळातील सर्व ५६ गावांमध्ये जमीन सुपीकता निर्देशांकाचे फ्लेक्स लावून पूर्ण झालेले आहेत.