बाप्पांचे आज आगमन..
By admin | Published: September 5, 2016 12:44 AM2016-09-05T00:44:52+5:302016-09-05T00:44:52+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील ६३५ सार्वजनिक गणेश मंडळे सज्ज; रोषणाई व सजावटीचे काम पूर्ण.
बुलडाणा, दि. ४ : जिल्ह्यात ५ ते १५ सप्टेंबरदरम्यान गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. या गणेशोत्सवाची जोरात तयारी सुरू झाली आहे. जिल्ह्यात ९५६ सार्वजनिक गणेश मंडळे असून, त्यापैकी ६३५ गणेश मंडळांनी आजपर्यंंत नोंदणी केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात ३४0 मंडळ आणि शहरी भागात २९५ मंडळे गणेशोत्सवासाठी सज्ज झाली आहेत.
जिल्ह्यात गेल्या २0 ते ३0 वर्षांंपासून अनेक गणेशोत्सव मंडळे कार्यरत असून, उत्सवादरम्यान प्रत्येक मंडळाकडून सामाजिक बांधीलकी राखली जात आहे. या दहा दिवसांच्या कालावधीत सार्वजनिक गणेश मंडळाकडून विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रम राबविल्या जात असतात. शहरात उत्सव मोठय़ा प्रमाणात साजरा होत असल्यामुळे शहरात विविध रस्त्यांवर भाविकभक्तांची वर्दळ असते.
सध्या सराफ गल्ली, बाजार चौक, कारंजा चौक, स्टेट बँक चौक, संभाजीनगर, चिखली रोड, मलकापूर रोड, जुना गाव, सुंदरखेड, महाराणा प्रताप चौक या ठिकाणी गणेश उत्सवाची तयारी जोरात सुरू झाली आहे व मंडळाचे कार्यकर्ते प्रत्येक दिवसाचे नियोजन करण्यात गुंतले आहेत. या कामाला नागरिकांकडूनही मोठय़ा प्रमाणात सहकार्य मिळताना दिसत आहे.
अधिकृत वीज जोडणी आवश्यक
गणेशोत्सव कालावधीत नागरिकांचा आनंद अबाधित रहावा, विजेमुळे कुठलाही अपघात होऊ नये म्हणून सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना यावर्षीपासून गणेशोत्सव कालावधीत अधिकृत वीज जोडणी घेणे आवश्यक केले आहे. महावितरणच्यावतीने अगदी रास्त दरात कुठलीही जटील प्रक्रिया न ठेवता प्रत्येक गणेश मंडळास तात्पुरता स्वरुपात वीज पुरवठा मिळण्याची खबरदारी घेण्यात आलेली आहे. महावितरणच्या उपविभागीय, शाखा अभियंता कार्यालयात तात्पुरत्या स्वरूपात अधिकृत वीज जोडणी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या अधिकृत वीज जोडणीमुळे गणेशोत्सव कालावधीत डेकोरेशन, प्रकाश सजावटीमध्ये कुठल्याही प्रकारची विजेमुळे बाधा येणार नाही. तसेच महावितरण ३ रुपये ७१ पैसे एवढय़ा कमी दरात वीज जोडणी देणार आहे.
बाजारपेठ सजली
आपल्या लाडक्या बप्पाच्या स्वागताकरिता बाजारपेठेत अनेक वस्तू व अलंकार पाहायला मिळत आहेत. बाजारपेठेत ५0 रुपयांपासून ते ५000 रुपयांपर्यंंतची शाडू, प्लॉस्टर ऑफ पॅरिसचे श्री गणेशाच्या मूर्ती आल्या आहेत. तर बाप्पाच्या आभूषणासहित सजावटीसाठी झालरपासून, महिरप फुलांची कमान, विविध फुले, मखर, दागिने उपलब्ध आहेत.