निष्काळजीपणामुळे बाळाचा मृत्यू; डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 12:49 AM2018-05-29T00:49:03+5:302018-05-29T00:49:03+5:30
खामगाव: निष्काळजीपणामुळे बाळाचा मृत्यू झाल्याप्रकरणी येथील शहर पोलिसांनी चांदे कॉलनीमधील डॉ. गणेश महाले यांच्याविरुद्ध सोमवारी गुन्हा दाखल केला. जिल्हा शल्य चिकित्सक यांनी गठित केलेल्या समितीच्या अहवालावरून ही कारवाई करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: निष्काळजीपणामुळे बाळाचा मृत्यू झाल्याप्रकरणी येथील शहर पोलिसांनी चांदे कॉलनीमधील डॉ. गणेश महाले यांच्याविरुद्ध सोमवारी गुन्हा दाखल केला. जिल्हा शल्य चिकित्सक यांनी गठित केलेल्या समितीच्या अहवालावरून ही कारवाई करण्यात आली.
शहरातील चांदे कॉलनीस्थित रहिवासी वर्षा गायकवाड यांना नातेवाइकांनी २७ ऑक्टोबर २0१६ रोजी डॉ. महाले यांच्या रुग्णालयात प्रसूतीसाठी भरती केले होते. दरम्यान, महिलेने मृत बाळाला जन्म दिला; परंतु महिलेचे पती नितीनकुमार गायकवाड यांनी डॉ. महाले यांच्या निष्काळजीपणामुळे बाळाचा मृत्यू झाल्याबाबत राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाकडे तक्रार दिली होती.
या तक्रारीवरून बुलडाणा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सरिता पाटील यांनी सात डॉक्टरांची समिती गठित केली. डॉ. महाले यांच्या जलंब रोडस्थित मॅटर्निटी अँण्ड नर्सिंग होममध्ये जाऊन पथकाने तपासणी केली. या तपासणीत डॉ. महाले यांनी लेबर रूम व ऑपरेशन थेटर गाइड लाइननुसार ठेवले नाही. तसेच हॉस्पिटलमध्ये प्रोटोकॉलनुसार काम केले नाही व बाळाला वाचविण्याचा गोल्डन मिनिट चुकविल्याचे तपासणीत दिसून आले. डॉ. महाले यांच्या निष्काळजीपणामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचा अहवाल समितीने शहर पोलीस स्टेशनला सादर केला. यावरून शहर पोलीस स्टेशनचे पीएसआय रवींद्र लांडे यांच्या फिर्यादीवरून डॉ. गणेश महाले यांच्याविरुद्ध कलम ३0४ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.