खामगावातून अपहरण झालेले बाळ दिल्लीत सापडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 01:34 AM2017-10-02T01:34:55+5:302017-10-02T01:35:22+5:30

बुलडाणा:खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयातून २७ सप्टेंबर रोजी पळविण्यात आलेल्या अर्भकाचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. अपहृत  बाळ दिल्लीत सुखरूप सापडल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शशीकुमार मीना यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. तीन दिवसांतच पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून न्यायालयाच्या आदेशाने बाळ आई-वडिलांना सोपविण्यात आले. दरम्यान, या बाळाची विक्री करण्यासाठी अपहरण करण्याचे आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

Baby kidnapped from Khagamau caught in Delhi! | खामगावातून अपहरण झालेले बाळ दिल्लीत सापडले!

खामगावातून अपहरण झालेले बाळ दिल्लीत सापडले!

Next
ठळक मुद्देव्रिकीसाठी झाले होते बाळाचे अपहरणसहा जणांना अटकन्यायालयाच्या आदेशाने आई-वडिलांच्या दिले ताब्यात!

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा:खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयातून २७ सप्टेंबर रोजी पळविण्यात आलेल्या अर्भकाचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. अपहृत  बाळ दिल्लीत सुखरूप सापडल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शशीकुमार मीना यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. तीन दिवसांतच पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून न्यायालयाच्या आदेशाने बाळ आई-वडिलांना सोपविण्यात आले. दरम्यान, या बाळाची विक्री करण्यासाठी अपहरण करण्याचे आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी येथील सुमैय्याबी आतीकखान  या महिलेचे पाच दिवसांचे बाळ २७ सप्टेंबर रोजी पहाटे ३.३0 वाजता एका बुरखाधारी महिलेने पळविले. ही घटना उघडकीस येताच खामगाव शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, आरोग्य प्रशासनाच्यावतीने गंभीर दखल घेत, परिचारिका आणि सुरक्षा रक्षकाला बडतर्फ करण्यात आले होते. त्याचवेळी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाचा समांतर तपास खामगाव शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेकडे दिला. स्थानिक गुन्हे शाखेने गुन्ह्याच्या तपासात तीन वेगवेगळी पथके तयार केली. यामध्ये गुन्ह्यात वापरलेल्या वाहनाचा सपोनि मनोज केदारे यांच्या पथकाने शोध घेऊन औरंगाबाद येथील नवीन बायजी पुरा येथे सापळा रचून बाळ चोरीसाठी वापरलेल्या वाहनाचा चालक राजे जहागीर खान (४0), वाहन भाड्याने करून देणारा  इरफान खान बशीर खान (२८) दोघेही रा. नवीन बायजी पुरा यांना ताब्यात घेतले. दोघांचीही चौकशी केली असता राजे जहागीर खान याने २६ सप्टेंबर रोजी खामगाव येथून बाळ आणण्यासाठी इमरान खानच्या मदतीने गाडी भाड्याने घेतली होती. त्यामुळे  मोहसिन हुसेन खान उपजिल्हा सामान्य रुग्णालयासमोर भेटला. दोन महिलांनी रुग्णालयातून बाळ आणल्यानंतर ते औरंगाबाद येथे पोहोचले. दरम्यान, बाळ चोरीसाठी वापरलेल्या गाडीच्या चालकाला ताब्यात घेतल्याची माहिती  उपरोक्त तिघांना मिळताच मुख्य आरोपी मोहसीन, त्याची पत्नी प्रीती दाविद गायकवाड व तिची आई वेदिका किशोर पिल्ले हे तिघे जण तेथून फरार झाले.
 दरम्यान, अपहृत बालक आणि दोन महिला सुरुवातीला मुंबई आणि तेथून दिल्ली  येथे गेल्याचे समजल्यानंतर बालकाच्या शोधासाठी  सपोनि मनोज केदारे यांच्या पथकाला दिल्ली येथे तर मोहसीनच्या शोधासाठी पोउपनि दिनकर गोरे यांच्या पथकाला मुंबई येथे रवाना करण्यात आले. तथापि, मुख्य आरोपी दौंड येथून पुण्याकडे येत असल्याची माहिती मिळाल्याने दिनकर गोरे यांनी दौंड रेल्वे पोलिसांच्या संयुक्त मदतीने मुख्य आरोपी मोहसीन हुसेन खान (२१), त्याची पत्नी प्रीती दाविद गायकवाड (पिल्ले) रा. खामगाव यांना दौंड येथून ताब्यात घेतले.
 त्याचवेळी सपोनि मनोज केदारे व त्यांच्या पथकाने दिल्ली येथून मल्लिका बेगम पठाण हिंमत खान रा. बाजार सावंगी, जि. औरंगाबाद, फिरदोस अस्लम आसमानी रा. गल्ली नं. ९ वजिराबाद, दिल्ली यांना ताब्यात घेतले.
 बाळ पळविण्यासाठी वापरलेले वाहन ताब्यात घेऊन चालक राजे जहागीर खान, इरफान खान यांना  सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून, खामगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

अर्भक सिल्लोडमार्गे दिल्लीला
हे अर्भक खामगाव येथून इंडिका कारने सिल्लोड व नंतर औरंगाबाद येथे नेण्यात आले. त्याचा सौदा आधी सिल्लोड व नंतर औरंगाबाद येथे होणार होता. पण पोलीस पाठलाग करीत असल्याची कुणकुण लागल्याने आरोपींनी त्याला औरंगाबाद येथून विमानाने दिल्लीला नेले. 

३५ लाखांचा सौदा
हे दाम्पत्य कोट्यधीश असून त्यांना मूल बाळ होत नसल्याने त्यांनी प्रीती व मोहसीन यांच्याशी ३५ लाखांत एक बाळाचा सौदा केला होता. या दाम्पत्याने ७ लाख रुपये अँडव्हान्सही दिले होते.

बाळ १२ तास उपाशी
खामगाव येथून पळविलेले बाळ विमानाने दिल्लीपर्यंत गेले खरे, पण या काळात त्याला साधे दुधसुद्धा आरोपींनी पाजले नाही.

घाईगडबडीत पत्र परिषद!
खामगाव येथील उपजिल्हा रुग्णालयातील अपहृत बालकाचा शोध लागल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून पत्र परिषद घेण्यात आली; मात्र एवढय़ा मोठय़ा घटनेबाबतच्या पत्र परिषदेचे आमंत्रण वृत्तपत्राच्या पत्रकारांना दिल्या गेले नाही. त्याचप्रमाणे या गुन्ह्याच्या तपासात महत्त्वाची भूमिका अदा करणार्‍या खामगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यू.के. जाधव पत्र परिषदेला उपस्थित नव्हते.
-
 

Web Title: Baby kidnapped from Khagamau caught in Delhi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.