आश्वासनानंतर शाळा बंद आंदोलन मागे
By admin | Published: July 22, 2014 11:47 PM2014-07-22T23:47:43+5:302014-07-23T00:07:41+5:30
गावातील पालकांनी गेल्या ४ दिवसांपासून मुलांना शाळेत पाठवणे बंद करुन आंदोलन सुरु केले होते.
धाड : येथील उर्दू माध्यमिक शाळेस गेल्या ५ वर्षापासून पुरेसे शिक्षक नसल्याकारणाने शालेय शिक्षणावर मोठा परिणाम होत आहे. यामुळे गावातील पालकांनी गेल्या ४ दिवसांपासून मुलांना शाळेत पाठवणे बंद करुन आंदोलन सुरु केले होते. पालकांच्या या आंदोलनाची दखल घेत १९ जुलै रोजी दुपारी शिक्षणाधिकारी वैशाली ठग, गटशिक्षणाधिकारी डी.बी.तेजनकर, शिक्षण विस्तार अधिकारी सौ.बोर्डे, तसेच शिक्षण विभागाचे डी.एस.जाधव यांचे पथकाने येथील उर्दू शाळेस भेट दिली. यावेळी अधिकार्यांनी आंदोलनकर्ते पालक व ग्रामस्थांशी चर्चा करुन समस्या मार्गी लावत आंदोलन मागे घेण्यात आले. स्थानिक जि.प.उर्दू हायस्कुल धाडच्या वर्ग ८,९,१0 च्या विद्यार्थ्यांना गेल्या ५ वर्षापासून हिंदी, मराठी व शा.शिक्षणास शिक्षक नसल्याने या ठिकाणी केवळ ४ शिक्षक सर्वच विषय शिकवत होते. परिणामी एका वर्गात १५0 विद्यार्थीना बसवून शिक्षण देण्यात येत होते. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले.हय़ा परिस्थितीस कंटाळून व वारंवार शिक्षण विभागास विनंती करुनही शिक्षक न मिळाल्याने ग्रामस्थांनी शाळा बंद आंदोलन सुरु केले. यामध्ये वर्ग १ ते १0 पर्यंत शाळा बंद ठेवण्यात आली. शेवटी या ठिकाणी शिक्षणाधिकारी वैशाली ठग व त्यांचे पथकाने जि.प.हाय.च्या समस्या व येथील कारभाराची माहिती घेऊन ग्रामस्थांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र ग्रामस्थांनी या ठिकाणी तात्काळ कायम स्वरूपी शिक्षक नेमण्याची मागणी लावून धरली. यावेळी शिक्षण विभागातील डी.एस.जाधव हय़ांनी ग्रामस्थांना माहिती दिली की शिक्षकांचे समायोजन होईपर्यंत या ठिकाणी कायम शिक्षक देणे शक्य नाही. तेव्हा या ठिकाणी तात्काळ तात्पुरते. २ व २ शिक्षक मराठी माध्यमाचे येथे देण्यात येऊन हा प्रश्न सध्या निकाली काढता येऊ शकतो अशी विनंती वरुन ग्रामस्थांनी आपले आंदोलन मागे घेतले. यावेळी रिझवान सौदागर, म.शफी, सोहिल काजी, म.शमीम, अन्नु सौदागर हय़ांचे सह असंख्य नागरिक व पालक हजर होते.