बुलडाणा जिल्ह्यात राज्य महामार्गाचा अनुशेष; जिल्हा रस्त्यांचा दर्जा बदलणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 01:58 PM2017-12-08T13:58:49+5:302017-12-08T14:03:20+5:30
बुलडाणा : जिल्ह्यातून जाणारे प्रमख राज्य महामार्ग आणि राज्य मार्ग राष्ट्रीय महामार्गात रुपांतरीत करण्यात आल्याने जिल्ह्यात राज्य महामार्गांचा अनुशेष निर्माण झाला आहे.
बुलडाणा : जिल्ह्यातून जाणारे प्रमख राज्य महामार्ग आणि राज्य मार्ग राष्ट्रीय महामार्गात रुपांतरीत करण्यात आल्याने जिल्ह्यात राज्य महामार्गांचा अनुशेष निर्माण झाला आहे. त्यानुषंगाने बुलडाणा जिल्ह्यातील ७३३ किमी लांबीचे सातही विधानसभा मतदार संघातील रस्त्यांच्या दर्जाेन्नतीचा प्रस्ताव सध्या तयार करण्यात येत आहे. या प्रमुख जिल्हा मार्ग आणि अन्य जिल्हा मार्गांचा येत्या काळात प्रमुख राज्य महामार्गाचा दर्जा देण्याच्या दृष्टीने प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. त्यासंदर्भात आता जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत तथा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता घ्यावी लागणार आहे.
जिल्हा मुख्यालये राष्ट्रीय महामार्गाला जोडण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारच्या योजनेतंर्गत औरंगाबाद-जालना-चिखली-बुलडाणा-मलकापूर हा राष्ट्रीय महामार्ग घोषीत करण्यात आला आहे. यासोबतच खामगाव, बुलडाणा, शेगाव, लोणार, मेहकर, देऊळगाव राजा शहरांनाही ७५३ ई, ७५३ एम, ५४८ सी या राष्ट्रीय महामार्गांना जोडण्यात जोडण्यात आले आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्र्गांची लांबी ५५८ किलोमीटर झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख राज्य महामार्ग आणि राज्य मार्गांची संख्या व लांबी कमी झाली आहे. या रस्त्यांचा मोठा अनुशेष त्यामुळे निर्माण झाला आहे. त्यातच राष्ट्रीय महामार्गात रुपांतरीत करण्यात आलेल्या रस्त्यांच्या लांबीपैकी २६८.८९ किमीचे रस्ते प्रत्यक्षात महामार्ग प्राधिकरणाला हस्तांतरीत करण्यात आले असले तरी २८८.९० किमी लांबीचे रस्ते अद्यापही हस्तांतरीत करण्यात आलेले नाही. त्यासंदर्भातील प्रक्रिया सुरू आहे.
प्रमुख जिल्हा मार्ग बनणार राज्य महामार्ग
मलकापूर-जालना हा प्रमुख राज्य महामार्ग राष्ट्रीय महामार्ग बनल्यामुळे जिल्ह्यातील मुख्य जिल्हा मार्ग, अन्य जिल्हा मार्ग काही ग्रामीण रस्त्यांचे भाग्य आता उजळले आहे. हे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाला हस्तांतरीत करावे लागणार आहे. त्याशिवाय या रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीचा मार्ग बिकट आहे. सातही मतदार संघातील प्रमुख जिल्हा, ग्रामीण रस्त्यांचा यात समोश आहे. जवळपास ७३३ किमी लांबीचे हे रस्ते आहेत. यात शेंदूर्जन-सायाळा-मेहकर, देऊळगाव राजा बोराखेडी बावरा, गोमेधर- पिंप्री माळी-मेहकर, लोणार-पिंप्री खंदारे, दाताळा-दाभाडी-पोफळी-कोर्हाळा बाजार-पाडळी-धाड, परडा-कोथळी, धामणगाव बढे-रिधोरा-पोफळी-कोल्हा गवळी-आव्हा-युनूसपूर-दहिगाव यास जिल्ह्यातील अनेक रस्त्यांचा यात समावेश आहे. मतदारसंघ निहाय हे रस्ते यात समाविष्ट करण्यात आले आहेत.
आ. सपकाळ यांचा पुढाकार
प्रकर्षाने हा मुद्दा बुलडाण्याचे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी लावून धरला आहे. यासंदर्भात बुलडाणा विधानसभा मतदार संघातील रस्त्यांचा प्रश्न निकाली काढावा अशी त्यांची मागणी होती. त्या दृष्टीने आता प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. दाताळा-दाभाडी-पोफळी-पाडळी-धाड हा रस्ता मतदार संघाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रमुख राज्य महामार्ग, राज्य मार्गाच्या अनुशेषाचा मुद्दा त्यांनी रेटला आहे.
जि. प. ठरावाची गरज
जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील हे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाला हस्तांतरीत करण्यासाठी प्रमथम जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये त्यासाठीचा ठराव घ्यावा लागणार आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही तो चर्चिला जाणे आवश्यक आहे. त्यासंदर्भात जिल्हाधिकारी चंद्रकांत पुलकुंडवार यांनी जिल्हा परिषदेला सुचना दिल्या असून अनुषंगीक कार्यवाहीबाबत निर्देशीतही केले असल्याचे सुत्रांनी सांगितले. आता जिल्हा परिषदेच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे.