मागासवर्गीय महिलेला मिळणार नगराध्यक्षपदाचा मान
By admin | Published: April 16, 2015 12:40 AM2015-04-16T00:40:21+5:302015-04-16T00:40:21+5:30
खामगाव नगरपालिका आरक्षणात नगराध्यक्ष पद अनुसूचित जातीसाठी राखीव; यामुळे अनेक राजकीय पक्षाचे समिकरण बदलणार.
नाना हिवराळे / खामगाव (जि. बुलडाणा):
राज्यातील नगराध्यक्षपदाचे आरक्षण १३ एप्रिल रोजी जाहीर झाले असून, यामध्ये खामगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष अनुसूचित जाती (एस.सी.) महिलासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. खामगाव नगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच आरक्षणाने मागासवर्गीय महिलेला नगराध्यक्ष होण्याचा मान मिळणार आहे.
खामगाव शहराची रजतनगरी म्हणून सर्वदूर ओळख आहे. सन १९६७ साली खामगाव पालिकेची स्थापना झाली. सन १९५९ पासून नगराध्यक्षपद निर्माण झाल्यानंतर खामगाव नगरीचे पहिले नगराध्यक्ष म्हणून अँड. शंकरराव ऊर्फ दादासाहेब बोबडे यांनी सुत्रे सांभाळली. १९५९ ते १९८१ अशी तब्बल २२ वर्षे दादासाहेबांनी पालिकेची सुत्रे सांभाळली. या कार्यकाळात त्यांनी खामगाव शहरात विविध विकासकामे करून शहराच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान दिले. यानंतर मध्यंतरीचा कार्यकाळ हा प्रशासकाकडे राहिला. १९८१ ते १९८५ पर्यंंत प्रशासकाने कामकाज पाहिले. १९८५ ला पुन्हा बोबडे घराण्याच्या हाती सत्ता जाऊन दादासाहेब व त्यांचे सुपुत्र नरेंद्र ऊर्फ बाबासाहेब बोबडे यांनी दोन वर्षे नगराध्यक्षपद सांभाळले होते.