किनगाव राजा ते राेहणा मार्गाची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:36 AM2021-08-23T04:36:41+5:302021-08-23T04:36:41+5:30
किनगाव राजा : किनगाव राजा ते राेहणा,देऊळगाव महीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे़ या रस्त्यावर दुसरबीडजवळ झालेल्या अपघाताची पुनरावृत्ती ...
किनगाव राजा : किनगाव राजा ते राेहणा,देऊळगाव महीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे़ या रस्त्यावर दुसरबीडजवळ झालेल्या अपघाताची पुनरावृत्ती हाेण्याची शक्यता आहे़ त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे़ याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष हाेत असल्याचे चित्र आहे़
किनगाव राजा रोहणा या मार्गाची मागील सात-आठ वर्षांपासून दुरवस्था झाली आहे़ रस्त्याचे बांधकाम तर दुरच साधी डागडुजीही करण्यात आलेली नाही़ त्यामुळे या मार्गांवर वाहन चालविणे जिकिरीचे झाले आहे़
सिंदखेड राजा, देऊळगाव तालुक्याला जोडणारा किनगाव राजा, रोहणा, देऊळगाव मही हा जवळचा मार्ग आहे़ येथून प्रवास केला तर जवळपास वीस किलोमीटरचा फेरा वाचतो़ किनगाव राजा ते रोहणा फाटा हे अंतर १८ किमी आहे़ तसेच समोर देऊळगाव मही ही मोठी बाजार पेठ आहे़ त्यामुळे या मार्गांवर वाहनाची नेहमी वर्दळ असते़ जड वाहतुकीमुळे या रस्त्याची दुरवस्था झाली आहे़
रस्त्यावर साचला चिखल
अनेक ठिकाणी माेठमाेठे खड्डे पडले आहेत़ त्यामुळे वाहन चालवताना वाहनधारकांना खूप कसरत करावी लागते गत चार-पाच दिवसांपासून किनगाव राजा परिसरात चांगला पाऊस झाला आहे़ त्यामुळे रस्त्यावर चिखल माती साचली आहे व बाजूला भराव नाही त्यामुळे वाहनधारकांना वाहन चालविणे जिकिरीचे झाले आहे.
किनगावराजा ते देऊळगाव मही रस्ता अत्यंत खराब झाला आहे़ आता पावसाळ्यात या मार्गाची अत्यंत दुरवस्था झाली आहे़ वेळोवेळी बांधकाम विभागाला निवेदने दिली पण दखल नाही. या रस्त्याची दुरुस्ती करावी.
खुशाल नागरे, ग्रामस्थ, हिवरखेड पूर्णा
हा रस्ता मार्चच्या बजेटमध्ये हिवरखेपूर्णापर्यंत मंजूर झालेला आहे व टेंडर पण निघाले आहे़ यात किनगाव राजा गावापासून ८०० मीटर हा सिमेंट रोड आहे व उर्वरित रस्ता डांबरीकरण होणार आहे़ कोरोना प्रादुर्भावामुळे उशीर झाला़ पण आता लवकरच कामाला सुरुवात होईल
आर. टी. शेळके, उपविभागीय अभियंता
सा. बां. विभाग, देऊळगाव राजा