आधीच अवकाळीचा फटका, वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू; कुटुंबीयांना मदतीची गरज
By सदानंद सिरसाट | Published: April 7, 2023 07:03 PM2023-04-07T19:03:33+5:302023-04-07T19:04:03+5:30
पिकांच्या नुकसानीचा अहवालही घेणार : बकऱ्यांच्या अहवालानंतर मदत
सदानंद सिरसाट
खामगाव : तालुक्यात शुक्रवारी दुपारी आलेल्या अवकाळी पावसाने पिकांसह जीवितहानीही केली. अंबिकापूर शिवारातील शेतात काम करणारा चितोडा येथील ४० वर्षीय तरुणाचा वीज पडून मृत्यू झाला. तर पळशी खुर्द येथील मृत बकऱ्यांचा शवविच्छेदन अहवाल पशुसंवर्धन विभागाकडून मागविण्यात आला आहे. त्यानंतर मदत दिली जाईल, असे प्रभारी उपविभागीय अधिकारी अतुल पाटोळे यांनी सांगितले.
शुक्रवारी सकाळपासूनच वातावरणात बदल झाला होता. दुपारनंतर विजांच्या कडकडाटांसह जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यावेळी अंबिकापूर शिवारात वीज पडल्याने परिसरात काम करीत असलेला चितोडा येथील गोपाल महादेव कवळे (वय ४०) या तरुणाचा मृत्यू झाला. शवविच्छेदनासाठी मृतदेह खामगावात आणण्यात आला. त्याबाबतचा अहवाल तलाठ्याने दिला आहे. तर तालुक्यातील पळशी खुर्द येथेही वीज पडल्याने ८ बकऱ्यांचा मृत्यू झाला. दुपारी १ वाजता ही घटना घडली. त्यामधे श्रीकृष्ण इंगळे, रवींद्र आढाव, विजय गव्हाळे यांच्या बकऱ्यांचा समावेश आहे. त्या बकऱ्यांचा शवविच्छेदन अहवाल पशुसंवर्धन विभागाकडून मागविण्यात आला. त्या अहवालानुसार मदत दिली जाईल, असे पाटोळे यांनी सांगितले. घटनास्थळी गावातील आशीष खोंदिल, रवींद्र पाटील, अविनाश पाटील, रवींद्र गुरव, गोपाल खोंदिल उपस्थित होते.
आधीच पिकांचे नुकसान
या परिसरात आधीच वादळासह पावसाने नुकसान झाले आहे. त्याबाबतचा अहवाल तलाठ्यांनी दिला आहे. पुन्हा त्याच भागात पावसाचा तडाखा बसला आहे. आता त्या ठिकाणच्या नुकसानाची पुन्हा पाहणी करता येत नाही. त्यामुळे आधीच्या अहवालानुसारच शासनस्तरावरून मदत मिळण्याची शक्यता आहे.