भाविकांनी अनुभवला बालाजींचा कल्याणोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 03:20 PM2019-12-03T15:20:27+5:302019-12-03T15:21:11+5:30
शेकडो भाविकांनी बालाजी महाराजांच्या कलोणोत्सवाचा सोहळा अनुभवला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : राजूर घाटातील व्यंकटगिरी पर्वतावरील बालाजी मंदिरात ३० नोव्हेंबरपासून सुरु असलेल्या ब्रह्मोत्सवाची ३ डिसेंबरला महाप्रसादाने सांगता होणार आहे. २ डिसेंबर रोजी ब्रह्मोत्सवातील विशेष आकर्षण असलेला बालाजींचा कल्याणोत्सव अर्थात श्रीदेवी, भूदेवी सोबत बालाजी महाराजांचा विवाह सोहळा पार पडला. शेकडो भाविकांनी बालाजी महाराजांच्या कलोणोत्सवाचा सोहळा अनुभवला.
व्यंकटगिरीवर ३० नाव्हेंबर रोजी छप्पनभोेग प्रसादाने ब्रह्मोत्सवाला सुरुवात झाली. १ डिसेंबर रोजी दुपारी आळंदी येथील महाराष्ट्र वारकरी प्रबोधन महासमितीचे कार्याध्यक्ष रामेश्वर महाराज शास्त्री यांचे प्रवचन पार पडले. २ डिसेंबर रोजी सकाळी ६ ते १२ यावेळेत विविधी धार्मिक विधी आणि यज्ञ पार पडला. तर दुपारी संत तुकाराम महाराजांचे विद्यमान वंशज प्रा. बाळासाहेब ज्ञानेश्वर माऊली देहूकर महाराज यांचे प्रवचन पार पडले. आपल्या अमोघ आणि ओघवत्या वाणीने त्यांनी भाविकांना मंत्रमुग्ध केले होते. भक्तीचा मार्ग हाच खरा यशाचा आणि जिवनाच्या कल्याणाचा मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले.
सायंकाळी सात वाजता ब्रह्मोत्सवातील प्रमुख आकर्षण असलेला बालाजींचा कल्याणोत्सव मोठ्या थाटामाटात पार पडला. यावेळी श्रीदेवी, भूदेवी सोबत बालाजी महाराजांचा विवाह विवाह विधीवत पार पडला. बालाजी सेवा समितीचे सर्व सदस्य सपत्नीक या सोहळ्यात सहभागी झाले होते. शिवाय शहरासह पंचक्रोषीतील इतर दाम्पतदेखील या विवाहसोहळ्याला उपस्थित होते. मंत्रोपचार, पूजा आणि विवाहाच्या तंत्रशुद्ध विधीने हा सोहळा पार पडला. या ब्रह्मोत्सवामध्ये भाविकांची मांदियाळी जमली होती.
मंगळवारी ३ डिसेंबर रोजी या उत्सवाची सांगता होणार आहे. सकाळी साडेदहा वाजता १०८ कलशाभिषेक होणार आहे. त्यानंतर सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत प्रा. बाळासाहेब ज्ञानेश्वर माऊली देहूकर महाराज यांचे काल्याचे कीर्तन होईल आणि त्यांनतर महाप्रसाद वितरणास सुरूवात होणार आहे. दरवर्षी महाप्रसादासाठी हजारो भाविकांची येथे गर्दी होते. यावर्षी देखील बालाजी सेवा समितीच्या वतीने महाप्रसादाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. भाविकांनी कलाशाभिषेक, काल्याचे कीर्तन आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन बालाजी सेवा समितीचे अध्यक्ष अरुण दिवटे यांनी केले आहे.