मुलांच्या भावविश्वाचा वेध घेणारे बालसाहित्य हवे - बाल साहित्यीक गणेश घुले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 06:04 PM2019-02-01T18:04:28+5:302019-02-01T18:05:09+5:30

आजच्या स्मार्ट फोनच्या युगात तंत्रस्नेही बालपिढीसाठी मुलांच्या भावविश्वाचा वेध घेणारे बालसाहित्य हवे, असे मत औरंगाबाद येथील बाल साहित्यीक गणेश घुले यांनी व्यक्त केले.

Balasahitya needs to be watched by children's feelings - Ganesh Ghule | मुलांच्या भावविश्वाचा वेध घेणारे बालसाहित्य हवे - बाल साहित्यीक गणेश घुले 

मुलांच्या भावविश्वाचा वेध घेणारे बालसाहित्य हवे - बाल साहित्यीक गणेश घुले 

Next

-  ब्रह्मानंद जाधव
बुलडाणा: मराठीतही बालसाहित्य लिहिणारे अनेक लेखक आजपर्यंत होऊन गेले आहेत. मराठी बाल साहित्याला एक समृद्ध परंपरा आहे. बालसाहित्यात अगदी छोट्या बाळांसाठी बडबडगीते, वाचता येणाºया लहान मुलांसाठी कविता,  साहसकथा, गमतीदार कथा, प्रवासवर्णने उपलब्ध आहे. परंतू आजच्या स्मार्ट फोनच्या युगात तंत्रस्नेही बालपिढीसाठी मुलांच्या भावविश्वाचा वेध घेणारे बालसाहित्य हवे, असे मत औरंगाबाद येथील बाल साहित्यीक गणेश घुले यांनी व्यक्त केले. ते बुलडाणा येथील भारत विद्यालयात कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.
प्रश्न : बाल साहित्याच्या परंपरेविषयी काय सांगाल? 
उत्तर: मराठी बाल साहित्याला एक संस्कारक्षम परंपरा लाभलेली आहे. अनेक पिढ्यांपासून ही परंपरा आजपर्यंत चालत आलेली आहे. पूर्वी आजी-आजोबा लहान मुलांसाठी गाणी-गोष्टी सांगत. ही एक बाल साहित्याची पहिली पायरीच म्हणावी लागेल. मुलांच्या भरण-पोषणाच्या काळात आजी-आजोबांच्या गोष्टी मुलांच्या मनामध्ये एक घर करुन बसत. परंतू आज ही संस्कारक्षम परंपराच लोप पावत असून परिणामी बाल साहित्याच्या या परंपरेला धक्का बसत आहे. 


प्रश्न : मुलांना बाल साहित्याकडे कसे वळवता येईल?
उत्तर : मुलांपर्यंत कविता ह्या गाण्याच्या माध्यमातून पोहचवा. मुले आज स्मार्ट फोनमुळे पुस्तक घेत नाहीत. तंत्रज्ञानाच्या या युगात मुले बाल साहित्यापासून दूर जात आहेत. मग ई-बुकची निर्मिती करा. मोबाईलवर व्हिडीओ, अ‍ॅडीओच्या माध्यमातून संगीतबद्ध कविता मुलांना एैकायला द्या, म्हणजे मुलांना बाल साहित्याची आवड निर्माण होईल. 


प्रश्न : मुलांच्या वयोगटानुसार बाल साहित्यात कसे बदल अपेक्षीत आहेत? 
उत्तर : मुलांच्या वयोगटानुसार बाल साहित्यात बदल अपेक्षीत आहेत. अगदी छोट्या मुलांना म्हणजे ज्यांना नुकतेच वाचता येत असेल, अशांना मोठ-मोठ्या कादंबºया वाचायला देऊन काही फायदा नाही; अथवा असे साहित्य त्यांना दिले, तर ते परत साहित्य वाचनाकडे कधीच रस दाखवणार नाहीत. त्यामुळे मुलांचा वयोगट लक्षात घेऊन त्यांना साहित्य उपलब्ध करून दिले पाहिजे. दहा वर्ष वयोगटापर्यंतच्या मुलांना जसे प्रश्न पडतील तसे साहित्य त्याला द्यायला हवे. मुलांमध्ये त्यांच्या भोवताली निर्माण होणाºया शंकाचे निरसर करणारे व चित्रशैलीचे साहित्य त्यांना द्यायला हवे. 


प्रश्न : स्मार्टफोनमुळे आजच्या बालपिढीवर काय परिणाम झाले आहेत? 
उत्तर : मुलांच्या हातात तंत्रज्ञानयुक्त 'स्मार्ट फोन' आल्यामुळे त्यांची पुस्तकांशी असलेली मैत्री मात्र तुटली आहे. स्मार्टफोनमुळे आजच्या बालपिढीतील उत्सुकताच नाहीशी झाली आहे. त्यामुळे मुलांच्या हातात स्मार्टफोनसोबत सकस बाल साहित्य पोहचविण्याची जबाबदारी बाल साहित्यीकांवर आहे. त्यासाठी मुलांना आवडेल असे साहित्य लिहिले गेले पाहिजे. ते साहित्य मुलांपर्यंत पोहचले पाहिजे. 


प्रश्न : बालसाहित्यासाठी शासनाकडून काय तरतूद केली पाहिजे? 
उत्तर : बालसाहित्य वाचविण्यासाठी गावोगावी बाल वाचनालय उघडले पाहिजे. बाल भवन उभे राहिले पाहिजे. बालसाहित्यावर शासनाचे लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. शासनाकडून बालसाहित्य वाढविण्यासाठी काही तरतूद म्हणून ग्रामीण भागात प्रत्येक वर्षी बाल साहित्य मेळाव्यासारखे उपक्रम राबविले पाहिजेत.


प्रश्न : ‘सुंदर माझी शाळा’ या विषयी काय सांगाल?
उत्तर : ‘घेताना उंच भरारी, पंखांना बळ देणारी’! ‘भविष्याची वेधशाळा गं, सुंदर माझी शाळा’! विद्यार्थ्यांचे आत्मबळ वाढवणारा सांगीतिक कार्यक्रम ‘सुंदर माझी शाळा’ महाराष्ट्रात सर्वत्र पोहचली आहे. आतापर्यंत सुंदर माझी शाळाचे ४८ प्रयोग महाराष्ट्रात झाले आहेत.  सुंदर माझी शाळा या पुस्तकाच्या माध्यमातून मुलांच्या भावविश्वाचा वेध घेण्यात आला आहे.

Web Title: Balasahitya needs to be watched by children's feelings - Ganesh Ghule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.