बनावट सोने तारण ठेवून बँकेची २७ लाखांनी फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 03:19 PM2019-12-16T15:19:37+5:302019-12-16T15:19:42+5:30
बँकेचे मुल्यांकन अधिकारी दीपक वर्मा व अन्य ११ जणांनी बँकेत बनावट सोने तारण ठेवून २७ लाखांनी बँकेची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद केले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: बँकेतील मुल्यांकन अधिकाऱ्याने जवळपास ११ जणांशी संगणमत करून बँकेत बनावट सोने गहाण ठेवून स्थानिक जिजामाता महिला नागरी सहकारी बँकेची २७ लाख रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी बुलडाणा शहर पोलिसांनी १२ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या सहा आरोपींना १५ डिसेंबर रोजी सायंकाळी बुलडाणा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची १८ डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.
तारण ठेवलेले सोने प्रत्यक्ष सोनाराकडे तपासणी करण्यात आली असता हा प्रकार उघड झाला. विशेष म्हणजे या साने तारण प्रकरणात अन्य धातूच्या दागिन्यांना सोन्याची पॉलीश करण्यात आली होती, असे पोलिस तपासात समोर येत आहे. जवळपास सहा महिन्यापासून हे प्रकरण सुरू होते. त्यात अखेर १५ डिसेंबर रोजी जिजामाता नागरी सहकारी बँकेचे व्यवस्थापक दीपक अग्रवाल यांनी पोलिसांत तक्रार दिली.
त्यामध्ये जिजामाता महिला नागरी सहकारी बँकेचे मुल्यांकन अधिकारी दीपक वर्मा व अन्य ११ जणांनी बँकेत बनावट सोने तारण ठेवून २७ लाखांनी बँकेची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद केले होते. त्यानुसार पोलिसांनी प्रकरणाचा तपास करून १५ डिसेंबर रोजी यातील दीपक वर्मासह संजय शंकर पठारकर, मोहन खरात, मनोहर श्रीराम सावळे, कन्हैयालाल बद्रीनारायण वर्मा आणि प्रविण रमाकांत वाडेकर या सहा आरोपींना ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयात हजर केले असता बुलडाणा न्यायालयाने सहा ही आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात एकूण १२ आरोपी आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते आणि ठाणेदार शिवाजी कांबले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमित जाधव हे करीत आहेत. दरम्यान, या प्रकारामुळे मात्र बुलडाणा शहरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, या प्रकरणा आणखी काही आरोपी वाढण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पोलिस तपास करत असून या प्रकरणाची व्याप्तीही मोठी असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
(प्रतिनिधी)