बँकांनी मुद्र योजनेअंतर्गत कर्ज वितरणाचे उद्दीष्ट पूर्ण करावे; जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 02:31 PM2017-11-13T14:31:18+5:302017-11-13T14:31:33+5:30
बुलडाणा : स्वयंरोजगार उभारण्याकरीता मुद्रा बँक योजना अत्यंत विश्वसनीय योजना आहे. या योजनेतून किशोर व तरूण या वयोगटात कर्ज देण्यात येते. अनेक तरूण स्वयंरोजगार उभारण्यासाठी बँकाकडून कर्ज मिळण्यासाठी धडपड करीत असतात. मुद्रा बँक योजना त्यांच्यासाठी उपयुक्त आहे. या योजनेतंर्गत राष्ट्रीयकृत बँकांना कर्ज वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण करीत तातडीने कर्ज वितरण करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी शनिवारी घेतली.
मुद्रा बँक योजना प्रचार प्रसार समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी सोनार, कौशल्य विकास व रोजगार विभागाचे सहायक संचालक चिमणकर, नाबार्डचे जिल्हा प्रबंधक सुभाष बोंदाडे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रभाकर श्रोते यांच्यासह बँकांचे अधिकारी आणि कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
मुद्रा बँक योजनेचा मोठ्या प्रमाणावर प्रचार-प्रसार करण्याचे सांगत जिल्हाधिकारी म्हणाले, मुद्रा योजनेतून युवकांनी स्वयंरोजगारासाठी कर्ज मिळवावे. बँकांनी होतकरू तरूणांना मुद्रा योजनेतून कर्ज वितरणाची प्रकरणे मंजूर करावीत. तसेच तरूण गटातील प्रकरणांनाही मोठ्या प्रमाणावर मंजूरात द्यावी. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी यांनी मुद्रा योजनेची माहिती दिली. नाबार्डचे श्री. बोंदाडे यांनी बँकनिहाय मुद्रा बँक कर्ज वितरणाचा आढावा घेतला.
यावेळी स्टेट बँक आॅफ इंडियाचे मोहता, महाराष्ट्र बँकेचे मुरकुटे यांच्यासह राष्ट्रीयकृत बँकेचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.