खामगावात सव्वा लाखांचा प्रतिबंधित गुटखा पकडला; शहर पोलीसांच्या गुन्हे शोध पथकाची कारवाई
By अनिल गवई | Published: August 2, 2023 08:56 PM2023-08-02T20:56:27+5:302023-08-02T20:56:27+5:30
शहरातील मुख्य वस्तीतील एका दुकानातून चोरट्या मार्गाने गुटखा विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती शहर पोलीसांच्या गुन्हे शोध पथकाला मिळाली.
खामगाव (बुलढाणा) : शहरातील मुख्य वस्तीतील एका दुकानातून चोरट्या मार्गाने गुटखा विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती शहर पोलीसांच्या गुन्हे शोध पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने बुधवारी छापा मारला. यात सव्वा लाखांचा प्रतिबंधित गुटखा आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. बुधवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे खामगाव शहरातील गुटखा माफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, खामगाव शहरातील सिव्हील लाइन भागातील अनिल ईश्वरलाल रूपाणी वय ३२ दैनंदिन गरजेच्या वस्तू विक्रीच्या दुकानातून गुटखा विक्री करीत असल्याची गुप्त माहिती शहर पोलीसांना मिळाली.
या माहितीच्या आधारे शहर पोलीसांच्या गुन्हे शोधपथकाने पडताळणी केली. खात्री पटल्यानंतर पोलीसांनी छापा मारला असता, सुंगधित तंबाखू, गुटखा, पानमसाला आणि मोबाइर्ल असा एकुण १,२६,०९२/- रुपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलीस उपनिरिक्षक पंकज सपकाळे यांच्या तक्रारीवरून उपरोक्त आरोपी विरोधात भादंवि कलम ३२८, अन्न व सुरक्षा मानके कायदा २००६ चे कलम २६ (२)(IV) शिक्षा पात्र कलम ५९(i) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.