वडगाव येथे बारसला साकारले रामायण, शेकडो वर्षांपासूनची परंपरा
By विवेक चांदुरकर | Published: November 25, 2023 02:15 PM2023-11-25T14:15:50+5:302023-11-25T14:16:22+5:30
जळगाव जामोद तालुक्यातील वडगाव येथे शेकडो वर्षांपासून रामायण साकारण्यात येते.
खामगाव : जळगाव जामोद तालुक्यातील वडगाव येथे रामायण साकारण्याची शेकडो वर्षांपासूनची परंपरा यावर्षीही २४ नोव्हेंबरच्या रात्री बारसनिमित्त जोपासण्यात आली. गावातील लहाणांपासून तर वृद्धांनी रामायणातील विविध पात्र साकारात रामायण सादर केले. गावातील असंख्य नागरिक रात्रभर रामायण बघण्याकरिता उपस्थित होते.
जळगाव जामोद तालुक्यातील वडगाव येथे शेकडो वर्षांपासून रामायण साकारण्यात येते. दिवाळीनंतर रामायणातील विविध पात्र साकारण्याचा सराव करण्यात येतो. रामायणातील पात्रांना शोभणार्या कलावंतांची पात्र साकारण्याकरिता निवड करण्यात येते. काही नागरिक वर्षानुवर्षांपासून विविध पात्र साकारत आहेत. यावर्षीही २४ नोव्हेंबरच्या रात्री ९ वाजताच्या सुमारास सुरूवात करण्यात आली. ज्या ठिकाणी पात्र तयार करण्यात येते. तेथून हनुमान मंदिराजवळ पात्राला वाजत गाजत आणण्यात आले. त्यांच्यासमोर एक परदा लावण्यात आला. यावेळी फटाके फोडण्यात आले.
सकाळी ६ वाजताच्यादरम्यान रामाने रावणाचा वध केल्यानंतर गावातून राम, लक्ष्मण, सीता व हनुमान यांची मिरवूणक काढण्यात आली. मिरवणूक मार्गावर गावातील महिलांनी सडा, सारवण करून रांगोळी काढली. त्यानंतर आरती करण्यात आली. रात्रभर कीर्तनाच्या माध्यमातून रामायणातील विविध पात्रांची माहिती देण्यात आली. तसेच विविध पात्र साकारणार्या कलावंतांनीही उष्कृष्ट संवाद साधले. यादरम्यान काही पात्र मनोरंजनाच्या दृष्टीकोणातूनही सादर करण्यात आले. या सादरीकरणादरम्यान वयोवृद्ध नागरिकांसोबतच लहान मुलेही हिरीरीने सहभाग घेतात. रात्रभर रामायण बघण्याकरिता लहान मुलांपासून वयोवृद्धांची गर्दी झाली होती.
अनेक वर्षांपासून बनवलेले आहेत वस्त्र
रामायणातील पात्र साकारताना त्यांचे वस्त्र हे अनेक वर्षांपूर्वी बनविण्यात आले आहेत. तेच वस्त्र दरवर्षी परिधान करण्यात येतात. तसेच तलवार, गदा, भाले यासह विविध वस्तूही अनेक वर्षांपूर्वी तयार करण्यात आल्या आहेत. त्याच वस्तूंचा वापर करण्यात येतो.
बारसला विशेष महत्व
वडगाव गावात बारसला विशेष महत्व आहे. दिवाळीनंतर भाऊबिजेला गावातील मुली गावात येत नाहीत तर बारसला येतात. गावातील सुना दिवाळीला माहेरी जातात तर बारसला वडगावात परत येतात. तसेच शहरात नोकरीवर असलेले गावातील नागरिकही बारसच्या दिवशी गावात येतात. यावेळी अनेकांच्या घरी पाहुणे आले असतात.