बर्फाच्छादित झाला बरमासक्ती परिसर, चिखलदऱ्यात दवबिंदूही गोठले...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 11:22 AM2022-01-29T11:22:53+5:302022-01-29T11:23:12+5:30
बर्फाच्छादित झाला बरमासक्ती परिसर
नरेंद्र जावरे
चिखलदरा (अमरावती) : सततच्या वातावरणातील गारव्यामुळे विदर्भाच्या नंदनवनात कमालीची थंडी कायम आहे. तापमान ३.७ डिग्रीपर्यंत खाली उतरले असून, शुक्रवारी सकाळी ७ वाजता बरमासक्ती परिसरात दवबिंदू गोठल्याने संपूर्ण परिसर पांढराशुभ्र दिसून आला. हाच प्रकार मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील दऱ्याखोऱ्यांत होता. संक्रांतीपासून तीळ-तीळ उन्हाळ्याची चाहूल लागते. वातावरण तापायला सुरुवात होते. परंतु मागील १५ ते २० दिवसांपासून संपूर्ण विदर्भात थंडीची लाट पसरलेली आहे. पारा कमालीचा घसरत असल्याने नागरिकांचे दैनंदिन कामकाजसुद्धा खोळंबले आहे.
विदर्भात थंडीचा तडाखा दाेन दिवस राहणार
नागपूर : नागपूरसह विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात थंडीचा तडाखा कायम आहे. कमाल आणि किमान तापमानात सरासरीपेक्षा ५ अंशाच्या घसरणीमुळे थंड लाट निर्माण झाली आहे. गाेंदिया ८.२ तर ८.४ अंश थंडीने नागपूर, वर्ध्यामध्ये लाेकांना चांगलेच गारठवले.
व्याघ्र प्रकल्पात पारा खाली
nचिखलदरा पर्यटनस्थळाचा पारा चार दिवसांपासून ४ डिग्री सेल्सिअस आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित घनदाट जंगलात गारव्याने अजूनच गारठा असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. भीमकुंड, पंचबोल, हरिमराई सेमाडोह, माखला, कुकरू, वैराट आदी परिसरातील खोरे गारठले आहे.
औरंगाबाद @ ८.१
nऔरंगाबाद : शहरात हिवाळ्यातील नीचांकी तापमानाची शुक्रवारी नोंद झाली. चिकलठाणा वेधशाळेत ८.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, कडाक्याच्या थंडीने शहर गारठले आहे. एमजीएम वेधशाळेत पहाटे ५.२७ वाजता किमान तापमान ७.२ अंश सेल्सिअस एवढे नोंदवले गेले.
पहाटे ५ वाजता मॉर्निंग वाॅकला जायची सवय आहे. परंतु अलीकडे कडाक्याची थंडी असल्याने शुक्रवारी नेहमीप्रमाणे ७ वाजता दरम्यान बरमासक्ती परिसरात संपूर्ण परिसर गोठलेला आढळून आला.
- मुकेश वानखडे, चिखलदरा