रॉकेलसाठी लागणार ‘आधार’!
By Admin | Published: October 25, 2016 02:54 AM2016-10-25T02:54:02+5:302016-10-25T02:54:02+5:30
मोताळा तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांना आता आधार व मोबाइल क्रमांक बंधनकारक.
मोताळा, दि. २४- तालुक्यातील अनुदानित केरोसिनकरिता पात्र असलेल्या सर्व शिधापत्रिकाधारकांना आता आधार व मोबाइल क्रमांक बंधनकारक केले आहे. रॉकेल मिळविण्यासाठी संबंधितांकडे ३0 ऑक्टोबरपर्यंत लाभार्थ्याने आधार कार्डची सत्यप्रत व आपला मोबाइल क्रमांक द्यावयाचा आहे. ३0 ऑक्टोबरपर्यंत आधार कार्ड लिंक न झाल्यास १ नोव्हेंबरपासून त्यांचा केरोसिन पुरवठा बंद केला जाणार आहे.
केंद्र शासनाने एलपीजी व केरोसिन लाभार्थ्यांंचे आधार क्रमांक संकलित करण्याचे व निर्धारित कालर्मयादेत आधार क्रमांक सादर न करणार्या लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ न देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने राज्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अनुदानित केरोसिन मिळण्यास पात्र लाभार्थ्यांंचे आधार क्रमांक संकलित करण्याचा निर्णय घेतला असून, अनुदानित केरोसिन पात्र लाभार्थ्यांंना ३0 ऑक्टोबरपर्यंंत संबंधितांकडे आधार व मोबाइल क्रमांक द्यावा लागणार आहे. केरोसिन वितरणातील काळा बाजार रोखण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने शिधापत्रिकाधारकांना आधारकार्ड, मोबाइल क्रमांक बंधनकारक केले आहे. तहसील स्तरावर आधार कार्ड लिंक करावयाचे असून, त्याबाबत संबंधितांना सूचना दिल्या आहेत. कार्डधारकांना कमी रॉकेल दिल्यानंतर उरलेला साठा ज्यादा दराने बेकायदेशीर विकत असल्याचा गोरखधंदा व रॉकेल वितरणातील काळा बाजार होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. वाहनांसाठी केरोसिनचा वापर, पेट्रोल पंपावर रॉकेलची भेसळ, एकाच शिधापत्रिकाधारकांची अनेक ठिकाणी नावे नोंदवून केरोसिनचा काळाबाजार आदींबाबत तक्रारींचा ओघ पाहता, शासन स्तरावर विविध उपाययोजना करण्यात आल्या; मात्र पायबंद बसत नसल्यामुळे या योजनेचे आधुनिकीकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार केरोसिन घेत असलेल्या प्रत्येक लाभार्थ्यांंचे मोबाइल क्रमांक घेऊन आधार क्रमांक लिंकींग करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तालुक्यात १२५ परवानाधारक केरोसिन विक्रेते असून, तालुक्यासाठी ७२ केएल रॉकेलचा कोटा देण्यात येतो.