बीट जमादार बाठे अखेर निलंबित!;जिल्हा पोलीस अधिक्षकांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 08:12 PM2018-12-03T20:12:49+5:302018-12-03T20:13:11+5:30
पोलीस स्टेशनमध्ये पैसे स्वीकारल्याचा व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल प्रकरणी संबधीत बिट जमादार निवृत्ती बाठे यांना सोमवारी तडकाफडकी निलंबित करण्यात आले.
खामगाव : पोलीस स्टेशनमध्ये पैसे स्वीकारल्याचा व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल प्रकरणी संबधीत बिट जमादार निवृत्ती बाठे यांना सोमवारी तडकाफडकी निलंबित करण्यात आले. याप्रकरणी पिंपळगाव राजा पोलिस स्टेशनचे ठाणेदार निखिल फटींग यांच्यावरही कारवाई प्रस्तावित आहे. त्यामुळे पोलिस विभागात एकच खळबळ उडाली आहे.
खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा पोलिस स्टेशनतंर्गत भंडारी येथे एकाच समाजातील दोन गटामध्ये तेढ निर्माण झाले. याप्रकरणी दाखल गुन्ह्यात महिलांची अटक लांबणीवर टाकण्यासाठी तसेच महिलांचा पीसीआर न काढण्यासाठी बीट जमादार निवृत्ती बाठे यांनी भंडारी येथील राहुल मंगलगिर मच्छरे यांना पैशांची मागणी केली. त्यानुसार ३ नोव्हेंबर रोजी पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनमधील मागील बाजूस असलेल्या खोलीत पैसे स्वीकारले. या संपूर्ण घटनाक्रमाचा व्हीडीओ सोशल मिडीयावर शनिवारी व्हायरल झाला. रविवारी प्रसिध्दी माध्यमातही वृत्त झळकले. त्यामुळे पित्त खवळलेल्या बीट जमादार बाठे याने राहुल मंगलगिर मच्छरे रा. भंडारी यांच्यासह व्हीडीओ क्लीप काढणा-यासह तीन साक्षीदारांना धमकी दिल्याचा प्रकार सोमवारी समोर आला. याप्रकरणी जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. प्रसिध्दी माध्यमात झळकलेल्या वृत्ताची तसेच अन्यायग्रस्तांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी संबंधित बीट जमादार निवृत्ती एकनाथ बाठे यांना तडकाफडकी निलंबित केले. तर ठाणेदार निखिल फटींग यांच्यावर प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात आली. या कारवाईमुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली असून, खाबुगिरी करणा-या पोलीस कर्मचारी आणि अधिका-यांचे धाबे दणाणले आहे.
- पिंपळगाव राजा पोलिसांच्या खाबुगिरीचा व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर सर्वप्रथम आॅनलाईन ‘लोकमत’ला हे वृत्त प्रसारीत झाले. सोमवारी ‘लोकमत’मध्येही हे वृत्त ठळकपणे झळकले. या वृत्तांची गंभीर दखल घेत, जिल्हा पोलिस अधिक्षकांनी पोलिसांची छबी सुधारण्यासाठी संबंधित पोलिस कर्मचा-यावर तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली.
पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनचे बीट जमादार बाठे यांना निलंबित करण्यात आले आहे. ठाणेदार फटींग यांच्यावरही प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात आली. याप्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे.
- डॉ. दिलीप पाटील-भुजबळ
जिल्हा पोलिस अधिक्षक, बुलडाणा
सोशल मिडीयावर व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर आपल्यासह सहका-यांचे आयुष्य बरबाद करण्याची धमकी संबंधित बीट जमादाराने दिली होती. प्रकरण आपसात मिटविण्यासाठीही आपल्यासह कुटुंबियांवर दबाव आणल्या जात होता. आता पोलिसांकडून आपल्याला सहकार्य मिळावे, ही अपेक्षा आहे.
-राहुल मच्छरे
अन्यायग्रस्त, भंडारी, ता. खामगाव.