खाद्यपदार्थात भेसळ कराल तर खबरदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:38 AM2021-08-19T04:38:10+5:302021-08-19T04:38:10+5:30
देशभरात ५ ऑगस्ट २००६ पासून अन्नसुरक्षा आणि मानके कायदा लागू करण्यात आला. त्यातील कलम ५० अन्वये विक्री केल्या जाणाऱ्या ...
देशभरात ५ ऑगस्ट २००६ पासून अन्नसुरक्षा आणि मानके कायदा लागू करण्यात आला. त्यातील कलम ५० अन्वये विक्री केल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांचा दर्जा योग्य नसल्यास पाच लाख, कमी दर्जाच्या अन्नपदार्थांचे उत्पादन, साठवणूक व विक्री केल्यास पाच लाख आणि खोटी जाहिरात दिल्यास दहा लाखांपर्यंत दंड होऊ शकतो; मात्र या विभागाकडे मुळातच मनुष्यबळ अगदीच कमी असल्याने अन्नपदार्थ नमुने तपासण्याचे प्रमाणही तुलनेने कमी आहे. त्यामुळे भेसळखोरांचे फावत असल्याचे दिसून येत आहे; मात्र बुलडाणा अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाच महिन्यात ३८० आस्थापनांची तपासणी करून तब्बल १६१ ठिकाणी नमुने घेतले असून, तपासणीसाठी पाठविले आहेत.
कोरोना काळात धडाकेबाज कारवाई
अन्न व औषध विभागाने एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांत जिल्ह्यातील ३८० आस्थापनांची तपासणी केली. त्यापैकी १६१ अन्न नमुने प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले, तर त्यापैकी ७ नमुने अप्रमाणित(कमी दर्जाचे) आढळून आले. तर १०८ नमुने प्रमाणित आढळून आले. सात पैकी चार प्रकरणी न्याय निर्णयासाठी दाखल केले असून, तीन प्रकरणांत ७३ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. सोबतच ११ अन्न पदार्थांच्या जप्ती कारवाया केल्या असून, ५५ लाख ९९ हजार ६६१ रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर तडजोडी प्रकरणात ७८ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
दोन परवाने निलंबित
अन्न व औषध विभागाने जिल्ह्यात केलेल्या कारवाईमध्ये भेसळखोरांचे धाबे दणाणले असून, लाखो रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर जिल्ह्यातील दोन आस्थापनांचा परवाना निलंबित केला असल्याची माहिती अन्न व औषध विभागाने दिली आहे. यापुढेही अशीच कारवाई केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
जिल्ह्यात कोणत्याही हाॅटेल्स, रेस्टॉरंट वा इतर ठिकाणी मिळणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये भेसळ आढळल्यास त्याची थेट कारवाई अन्न व औषध विभागाकडे नागरिकांनी करावी. प्रशासन सजग असून, नागरिकांनी दक्ष राहून विभागाकडे माहिती द्यावी, संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल.
-एस.डी. केदारे, सहायक आयुक्त अन्न, बुलडाणा.