डोंगरशेवलीच्या मंदिरात अस्वलाचा वावर
By निलेश जोशी | Published: February 29, 2024 08:02 PM2024-02-29T20:02:23+5:302024-02-29T20:02:49+5:30
नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन.
बुलढाणा : चिखली तालुक्यात येत असलेल्या डोंगरशेवली येथील पुरातन सोमनाथ मंदिरामध्ये अस्वलांचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्ञानगंगा अभयारण्यालगत हा भाग असून प्रादेशिक वनविभागाने या अस्वलांना पकडण्यासाठी मंदिराजवळ पिंजरा लावला आहे. दरम्यान २७ फेब्रुवारी रोजी एक मादी अस्वल व तिची पिल्ले थेट मंदिरामध्ये घुसल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. तेथील तेल, नारळ तथा प्रसाद खाण्यासाठी हे अस्वल येत असावे असा कयास आहे. दरम्यान बुलडाणा वन परिक्षेत्राअंतर्गत येणारे डोंगरशेवली गावं वन्यप्राण्यांच्या मुक्त संचाराने अनेकदा चर्चेत आला आहे. आता पुन्हा या अस्वलांच्या वावरामुळे ते चर्चेत आहे.
ज्ञानगंगा अभयारण्याला गाव लागून असल्यामुळे बऱ्याचदा बिबट्या, अस्वल, तडस अशा हिंस्त्र प्राण्यांचा या भागातील शेत शिवारात धुमाकूळ चालतो. असे अनेक व्हिडीओ यापूर्वी समोर आले आहेत. या गावात श्री सोमनाथाचे मंदिर आहे. २७ फेब्रुवारीच्या रात्रीचे ९ वाजेच्या सुमारास या मंदिरात एक अस्वल आपल्या तीन पिल्लांसह शिरलं. इतकचं नाही, तर थेट मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन महादेवाच्या पिंडीजवळ हे अस्वलाचं कुटुंब थांबलं. तेथील प्रसाद म्हणून ठेवलेल्या वस्तूही या अस्वलांनी खाल्ल्या. काही क्षण मंदिरात थांबल्यानंतर हे मादी अस्वल व तिची पिल्ले तेथून निघून गेली. हा सगळा प्रकार तेथील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
वनविभागाने लावला पिंजरा
संभाव्य धोका पाहता प्रादेशिक वनविभागाने मंदिर परिसरात या अस्वलांना पकड्यासाठी पिंजरा लावला आहे. दरम्यान या मंदिर परिसरात नागरिकांनी एकटे जाऊ नये. तसेच या भागात अस्वल दिसल्यास त्याला हुसकावण्याचा प्रयत्न करू नये. सोबतच सायंकाळच्या वेळीही मंदिराकडे शक्यतो नागरिकांनी जाऊ नये. तसचे या परिसरात सतर्क राहावे, असे प्रादेशिक वनविभागाने स्पष्ट केले आहे.