अस्वल, निलगायींचा ज्ञानगंगा अभयारण्यात स्वच्छंद विहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 17:03 IST2020-04-21T17:01:39+5:302020-04-21T17:03:39+5:30
५४ कृत्रिम पाणवठ्यावर स्वच्छंदपणे बागडत असून अस्वलही आपल्या पिल्लासह पाण्याचा मनसोक्त आनंद लुटत आहेत.

अस्वल, निलगायींचा ज्ञानगंगा अभयारण्यात स्वच्छंद विहार
बुलडाणा: कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाउन असल्यामुळे ज्ञानगंगा अभयारण्यातून जाणाºया २५ किमी लांबीच्या रस्त्यावरही वाहनांची वर्दळ आता बंद झाली आहे. परिणामी चक्क दिवसाच आता प्राणी अभयारण्यातील ५४ कृत्रिम पाणवठ्यावर स्वच्छंदपणे बागडत असून अस्वलही आपल्या पिल्लासह पाण्याचा मनसोक्त आनंद लुटत आहे. नाही म्हणायला सध्या बुलडाणा जिल्ह्यातील तापमापीचा पारा हा ४० अंश सेल्सिअस पार गेला आहे. अशा स्थितीत होणाºया काहीलीपासून बचाववासाठी वन्यप्राण्यांना अभयारण्यातील कृत्रीम पाणवठ्याचा आधार मिळत आहे.
बुलडाणा, चिखली, मोताळा आणि खामगाव या चार तालुक्यांच्या सिमेवर सुमारे २२० चौ.किमी विस्तार असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात सध्या सर्रासपणे वन्यप्राणी रस्त्यालगतच्या पाणवठ्यावर बिनधास्तपणे वावर करत आहे. टीपेश्वरमधून आलेल्या टी-१ सी-१ वाघामुळे ज्ञानगंगा अभयारण्य प्रसिद्धीच्या झोतात आले असले तरी अस्वलांसाठी हे अभयारण्य तसे प्रसिद्ध आहे. त्यामुळे साधारणत: पाणवठ्यावर अस्वलांचा वावर अधिकच दिसतो. त्यापाठोपाठ नील गाय, मोरांचीही पाणवठ्यावर मस्ती सुरू असल्याचे दिसून येत आहे. ज्ञानगंगा अभयारण्यात सध्या ५४ कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले असून या पाणवठ्यावर हे प्राणी स्वच्छंदपणे बागडत आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वन्यप्राण्यांनाही त्याची लागन होऊ नये म्हणून ज्ञानगंगा अभयारण्याच्या परिसरात असलेल्या गावांमध्येही जागृती करण्यात आली आहे. गाईड असलेल्या १४ जणांनाही धान्यचे वन्यजीव विभागाकडून वितरण करण्यात आल्यामुळे तसाही ज्ञानगंगातील काही प्रमाणात असलेला माणसांचा वापर कमी झाला आहे. त्यामुळे बिनदिक्कतपणे हे वन्यजीव सध्या पाणवठ्यावर तृष्णातृप्ती करत आहे.
२० ट्रॅप कॅमेरे
ज्ञानगंगा अभयारण्यात जवळपास २० ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले असून या कॅमेºयामध्ये पहाटे, दुपारी व सायंकाळदरम्यान हे वन्यजीव पाणवठ्यावर वावरताना टिपल्या गेले आहेत.